Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एचआयव्ही बाधित रूग्ण शोध मोहिमेसाठीचा लिंक वर्कर प्रोजेक्ट अधिक क्षमतेने चालवा - जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे

एचआयव्ही बाधित रूग्ण शोध मोहिमेसाठीचा  लिंक वर्कर प्रोजेक्ट अधिक क्षमतेने चालवा - जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे


सांगली दि. 22 : नव्याने एचआयव्ही बाधित झालेल्यांशी तातडीने संपर्क व्हावा यासाठी रक्तपेढी तसेच रक्त तपासणी सेंटरच्या ठिकाणी संपूर्ण पत्ता असलेली माहिती घ्यावी. त्यामुळे एचआयव्ही बाधितांचे ट्रेसिंग करणे सोयीचे होईल. त्याचबरोबर त्यांचा संपर्क क्रमांकही एड्स प्रतिबंधक कार्यालयाकडे द्यावा. तसेच एचआयव्ही बाधित रूग्ण शोध मोहिमेसाठीचा लिंक वर्कर प्रोजेक्ट अधिक क्षमतेने चालवावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रम त्रैमासिक आढावा बैठक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी  डॉ. सुनिल आंबोळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी विवेक सावंत यांच्यासह विविध आरोग्य केंद्रांचे  वैद्यकिय अधिकारी  उपस्थित होते.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे म्हणाले, जिल्ह्यामध्ये ज्या गावात एचआयव्ही बाधित रूग्णांची संख्या जास्त आहे, तसेच गुप्तरोग्यांच्या संख्येचे प्रमाण अधिक आहे अशी 100 गावे  निश्चित करण्यात येत असून या ठिकाणी लिंक वर्कर प्रोजेक्ट अधिक क्षमतेने राबविण्यात यावा. यामुळे एचआयव्ही बाधितांचा नेमका आकडा निश्चित करता येवून त्यानुसार एआरटी सेंटरवर उपचार करणे सोयीचे होईल. रक्तदात्यांमध्ये काहींचे रक्त तपासणीचे अहवाल हे एचआयव्ही पॉझिटीव्ह येतात, अशा व्यक्तींना त्वरीत संपर्क साधून याबाबत अवगत करावे. त्याचबरोबर एचआयव्ही बाधित रूग्णांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यात यावा.

जिल्ह्यात एप्रिल 2021 ते डिसेंबर 2021 या काळात 64 हजार 591 सर्वसाधारण एचआयव्ही टेस्टींग करण्यात आले. यामध्ये 333 रूग्ण एचआयव्ही बाधित आढळून आले आहेत. यापैकी 312 रूग्णांवर नोंदणीकृत एआरटी सेंटरवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. एचआयव्ही पॉझिटीव्हीटीचे हे प्रमाण 0.52 टक्के इतके आहे.  त्याचबरोबर एप्रिल 2021 ते डिसेंबर 2021 पर्यंत एएनसी एचआयव्ही टेस्टींग 43 हजार 329 करण्यात आले असून यामध्ये 70 रूग्ण बाधित आढळले आहेत. हे पॉझिटीव्हीटी प्रमाणे 0.03 टक्के इतके आहे.

जिल्हा कार्यक्रम अधिकारी विवेक सावंत यांनी एड्स उपाययोजना व जनजागृतीबाबत सविस्तर माहिती देवून सुरू असलेल्या उपक्रमांचे सादरीकरण केले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.