रशिया-युक्रेन युद्धावरच्या भारतीय भूमिकेवर अमेरिका नाराज
नवी दिल्लीः सध्या रशियाचा युक्रेन घशात घालण्याचा प्रयत्न सुरूय. हे युद्ध तिसऱ्या महायुद्धाची नांदी तर ठरणार नाही ना, अशी अनेकांना भीतीय.'नाटो'ने रशियाला वारंवार इशारे दिलेत. अमेरिकेनेही रशियाच्या आक्रमक भूमिकेवर आक्षेप घेतलाय. मात्र, साऱ्यांच्या म्हणण्याला वाटाण्याच्या अक्षता लावत पुतीन यांनी घुसखोरी सुरूच ठेवलीय. अचानक उद्भवलेल्या या युद्धावर भारताने आपली निष्पक्ष भूमिका कायम ठेवलीय. आता याचा त्रास अमेरिकेला होतोय. अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनी यावरच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत बोट ठेवले. इतकेच नाही, तर याबाबत आपण भारताशी बोलणार असल्याचे म्हटले आहे. एकंदर अमेरिका भारताने घेतलेल्या भूमिकेवर नाराज असल्याचे समजते. खरंच, येणाऱ्या काळात भारत आपली भूमिका बदलेल का?
भारताची भूमिका अशी का?
रशिया-युक्रेन युद्धात पुतीन यांच्या बेबंदशाहीविरोधात बहुतांश देशांनी आवाज उठवलाय. मात्र, भारताने निष्पक्षवादी भूमिका घेतलीय. कारण रशिया हा भारताचा खूप जुना मित्र आहे. आतापर्यंत भारताने रशियाच्या अंतर्गत प्रश्नांत कधीही हस्तक्षेप केला नाही. दुसरीकडे गेल्या दीड दशकात अमेरिकेसोबतही भारताचे संबंध खूप सुधारले आहेत. विशेषतः चीन जेव्हा आक्रमक होतो, तेव्हा भारताला अमेरिकेचा आधार असतो. हे सारे आंतरराष्ट्रीय संबंध पाहता भारत कोंडीत सापडलाय. मात्र, भारताच्या निष्पक्ष भूमिकेवर अमेरिका नाराजय.
परराष्ट्र मंत्र्यांमध्ये काय चर्चा?
पीटीआयच्या रिपोर्टनुसार, रशियाच्या हल्ल्याविरोधात भारत अमेरिकेच्या सोबत आहे का, असा प्रश्न बायडेन यांना एका पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. यावर बायडेन म्हणाले की, आम्ही भारतासोबत युक्रेनच्या संकटाबाबत चर्चा करतोय. या प्रकरणी अजून कोणताडी तोडगा निघालेला नाही. अमेरिकेला युक्रेन संकटावर भारताचा पूर्ण पाठिंबा हवाय. त्यामुळेच अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन यांनी गुरुवारीच भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. सुब्रह्मण्यम् जयशंकर यांच्याशी या प्रश्नी चर्चा केली. यावेळी डॉ. जयंशकर यांनी रशियाचा निषेध नोंदवणे, युक्रेनमधून रशियाला तात्काळ माघार घ्यायला लावणे आणि युद्ध समाप्तीसाठी मजबूत सामूहिक प्रतिक्रियेची आवश्यकता व्यक्त केली.
पुतीन यांच्याशी संवाद भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाच्या आक्रमणानंतर पुतीन यांच्याशी फोनवरून चर्चा केली. रशिया आणि 'नाटो' मधील मतभेदावर चर्चा करून तोडगा काढण्याचे आवाहन केले. शिवाय रशियाने सुरू केलेला हिंसाचार तात्काळ थांबवावा. दोन्ही पक्षांनी बसून राजकीय चर्चेतून मार्ग काढावा, असे आवाहन केले. तर दुसरीकडे युक्रेननेही भारताकडे मदत मागितली आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर पुढे काय होणार, भारत आपली निष्पक्षपातीपणाची भूमिका बदलणार का, अमेरिकेला पूर्ण पाठिंबा देणार का, हे पाहावे लागेल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.