राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमात सांगली जिल्ह्याचे काम राज्यात आदर्शवत - मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी
सांगली, दि. 25, : लहान बालकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतात. यातील अनेक आजार असे आहेत ज्यांवर बालक लहान असतानाच उपचार सुरू केला तर त्याचा फार मोठा फायदा होवू शकतो. सांगली जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गतचे कामकाज राज्यात आदर्शवत आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले.
हॉटेल द ग्रेट मराठा सांगली येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम प्रशिक्षण, डिजीटल श्रवणयंत्र वाटप शुभारंभ व पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. विवेक पाटील, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी, जिल्हा कार्यक्रम सहायक अनिता हसबणीस, लाभार्थी, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, अनेक लहान बालकांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होत असतात. त्यांच्यावर लहानपणीच लवकर उपचार केल्यास लाभदायक ठरू शकते. जिल्ह्यात जवळपास 0 ते 6 वर्षे वयोगटातील दोन लाख बालके आहेत. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम टिमची संख्या मर्यादित असल्याने ते प्रत्येक ठिकाणी पोहचू शकत नाहीत. त्यामुळे त्यांनी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना प्रशिक्षण द्यावे. अंगणवाडी सेविकांच्यामार्फत त्यांच्यामार्फत प्रत्येक बालकाची तपासणी केली जाईल. काही आजार आढणाऱ्या बालकांची पुन्हा राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम टीम मार्फत तपासणी केली जाईल. प्रत्येक बालकास लवकरात लवकर उपचार मिळावेत यासाठी जिल्हा परिषद यंत्रणा, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम यंत्रणा यांनी एकत्रितपणे काम करावे. याबरोबरच प्रायव्हेट इंस्टिट्यूट सोबत समन्वय ठेवून बालकांना उपचार द्यावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे म्हणाले, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत कार्यरत टीमला फील्डवर काम करत असताना आवश्यक असणाऱ्या बाबींचे सखोल मार्गदर्शन होण्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. त्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम तयार करून त्याला प्रात्यक्षिकांची जोड देण्याच्या दृष्टीने येत्या काळात नियोजन करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट सेवा दिलेल्या तसेच कोविड सेंटरमध्ये अहोरात्र सेवा बजावलेल्या डॉ. प्रसाद पाटील, डॉ. संदिप साळवी, डॉ. प्रकाश मोरे, डॉ. सुनिता गायकवाड, डॉ. प्रियांका पाटील, डॉ. कल्याणी शिंदगी, डॉ. नवाजशरिफ मुजावर व योगेश कदम यांचा सत्कार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी कर्णबधीर बालकांना प्राथमिक स्वरूपात डिजीटल श्रवणयंत्राचे वाटप जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्याहस्ते करण्यात आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.