सुरेश पाटलांनी पुरस्कार उपक्रमातून जनसेवा मूल्यांची पाठराखण केली..!!
प्रा. एन.डी.बिरनाळे लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे माजी मानद सचिव स्व. नेमगोंडा दादा पाटील यांची ४९ वी पुण्यतिथी दि. २८ फेब्रुवारी २०२२ रोजी दु. ४.०० वा. सांगलीच्या राजमती भवन मध्ये संपन्न होणार आहे त्यांच्या नावाने डॉ. संजय ओक मुंबई यांना डॉ. शिवानंद सोरटूर यांच्या हस्ते नेमगोंडा पाटील जनसेवा पुरस्कार देऊन डॉ. ओक यांनी कोविड काळात महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष म्हणून केलेल्या जनसेवेचा सन्मान ही घटना पुरोगामी महाराष्ट्राच्या शिरपेचातील मानाचा तुरा आहे. या उपक्रमातून सुरेश पाटलांनी जनसेवा मूल्याची पाठराखण केली आहे.
पुरस्काराचे हे ३१ वे वर्ष आहे. गेली तीन दशके अथकपणे सुरेश पाटील राबवत आहेत. श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्टचा हा उपक्रम मानद सचिव म्हणून अत्यंत नेटाने राबविताना नेमगोंडा पाटील यांच्या भरीव जनसेवेचे स्मरण भक्तिभावाने करण्यात सुरेश पाटील कोणतीही कसूर ठेवत नाहीत.
आतापर्यंत त्यांनी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांना नेमगोंडा पाटील जनसेवा व श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील विशेष सेवा पुरस्कारांने सन्मानित केले आहे. सुरेश अण्णांची चांगल्याला चांगले म्हणण्याची दानत या उपक्रमातून स्पष्ट होते. या उपक्रमातून त्यांनी अनेक दिग्गजांची मार्गदर्शनपर व्याख्याने जनतेला ऐकवण्याची संधी दिली आहे याचे सामाजिक व सांस्कृतिक मूल्य निश्चितच मोठे आहे. सुरेश पाटील हे महाराष्ट्रात उत्कृष्ट जनसेवा करणाऱ्यांच्या कायम शोधात असतात. अशा मंडळीना सन्मानाने निमंत्रित करुन त्यांच्या भरीव जनसेवेची नोंद घेऊन त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारणे हे खरे मानवतावादी काम आहे. यातून कृतज्ञता हे मानवी मूल्य संवर्धित होते व त्याचबरोबर नव्या पिढीला जनसेवेची प्रेरणा नक्कीच मिळते.
डॉ. संजय ओक हे महाराष्ट्र राज्य कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष आहेत. कोविड संसर्ग प्रतिबंधक क्षेत्रातील जागतिक स्तरावर त्यांनी अभ्यास केला आणि टास्क फोर्सच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला मास्क, सॅनिटायझर वापर, सोशल डिस्टशिंग व लाॅकडाऊन कालावधी याबाबत मौलिक सल्ला दिला. राज्यभर कोविड रुग्ण उपचाराचे मार्गदर्शन करुन लाखो लोकांचे जीव वाचवले. जनतेला कोविड प्रतिबंधक टिप्स दिले.. आणि जनतेला फार मोठा दिलासा मिळाला हे काम अजोड आहे. अशा कामाची दखल राजमती ट्रस्टच्या माध्यमातून सुरेश अण्णांनी घेतली व त्यांना जनसेवा पुरस्कार जाहीर केला. या पाठिमागे अण्णांनी राज्यातील जनतेच्या आरोग्याला प्राधान्य दिले आहे ही बाब अधोरेखित होते. याचवेळी सांगलीच्या श्रीमती उषाताई अण्णासाहेब पाटील यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना श्रीमती राजमती नेमगोंडा पाटील विशेष सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हे अण्णांचे स्त्रीदाक्षिण्य लक्षवेधी आहे. नेमगोंडा दादा पाटील आणि राजमती नेमगोंडा पाटील यांनी कोट्यवधी रुपयांची इस्टेट लठ्ठे एज्युकेशन सोसायटीला दान केली.आधुनिक भामाशा आणि दानचिंतामणी म्हणून त्यांचा समाजाने सन्मान केला.
राजमती अक्कांवर स्व. कळंत्रे अक्कांच्या कार्याचा जबरदस्त पगडा होता. महिला उन्नतीबाबत त्यांनी केलेल्या कामातून महिला या दुर्बल कधीच नसतात.. त्यांना पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याची संधी दिली पाहिजे.. पुरुष आणि स्त्री असा भेदभाव करणं हा सनातनी दृष्टीकोन समूळ नष्ट झाला पाहिजे या विचाराने नेमगोंडा आणि राजमती अक्कांनी काम केले आहे. राजमती अक्कांनी अनेक वर्षे जैन महिलाश्रम व महिला परिषदेवर अध्यक्ष व सेक्रेटरी म्हणून काम केले होते. नेमगोंडा पाटील लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव असताना अनेक गरजू महिलांना नोकऱ्या देऊन त्यांचे संसार उभे केले होते. ही खरी जनसेवा व विशेष सेवा होय. आज सुरेश अण्णा गेली ३१ वर्षे नेमगोंडा व राजमती अक्कांच्या कामाचा वारसा नेटाने पुढे नेत आहेत. जनसेवा चळवळीचा इतिहास याची नोंद घेतल्याशिवाय पुढे सरकूच शकत नाही हे मात्र नक्की..!!
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.