नवाब मलिक यांना जेजे रुग्णालयातून डिस्चार्ज; ईडी कार्यालयात दाखल करणार
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना आज (दि. 2 फेब्रुवारी)रोजी जेजे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. तसेच, सकाळी 10 वाजता त्यांना ईडी कार्यालयात परत नेले जाणारा आहे. नवाब मलिक यांना (25 फेब्रुवारी)रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यांना पोटदुखीचा त्रास सुरु असल्याने जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते
मनी लॉड्रींग प्रकरणात राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना बुधवारी अटक करण्यात आली होती. ईडीने तब्बल आठ तास चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन मार्चपर्यंत, मलिकांना ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, नवाब मलिक यांना तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यांना पोटदुखीचा त्रास सुरु असल्याने जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.
घरातून जेवण देण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली
नवाब मलिक यांच्या वकिलांनी ईडीच्या कोठडीदरम्यान तीन मागण्यासांठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार ईडीच्या कोठडीच नवाब मलिकांना औषध आणि त्यांच्या घरातून जेवण देण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे. तसेच, चौकशीवेळी वकिलांना सोबत उपस्थित राहता येणार आहे.
महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकार आणि ईडी विरोधात रान उठवले
दरम्यान, मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. महाविकास आघाडी आणि भाजपा यांनी एकमेकांविरोध आंदोलने केली आहेत. महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकार आणि ईडी विरोधात रान उठवले आहे. तर भाजपाने नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.
३०० कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार
दाऊद इब्राहीम टोळी क्रिकेटवरील सट्टेबाजी आणि बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार करत असल्याच्या आरोपावरून ईडीने दाऊद आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ईडीने दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला ताब्यात घेऊन चौकशी केली़. दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे 300 कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱ्या कंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे ईडीला तपासात आढळले. त्यानुसार ईडीने बुधवारी ही कारवाई केली.
धमकावून बळकावल्या मालमत्ता
ईडीने मलिक यांना सत्र न्यायालयात हजर केले. त्यावेळी ईडीच्या वतीने अतिरिक्त महान्याय अभिकर्ता अनिल सिंह यांनी बाजू मांडली. दाऊद हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहे. त्याची अनेक ठिकाणी बेकायदा संपत्ती असून 3 फेब्रुवारीला दाऊदविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हसिना पारकरच्या माध्यमातून दाऊद भारतातील व्यवहार करायचा. तिच्या माध्यमातून अनेक ठिकाणी संपत्ती गोळा करण्यात आली. हसिना पारकर आणि नवाब मलिक यांच्यात आर्थिक संबंध असून, तिच्याशी संबंधित मालमत्ता नवाब मलिक यांनी खरेदी केली.
प्रकरण आर्थिक गैरव्यवहाराचे असल्याचा दावा
कुर्ला येथील मालमत्ता ही दाऊदच्या हस्तकांशी संबंधित होती. ती नवाब मलिकांच्या कुटुंबियांची मालकी असलेल्या कंपनीच्या नियंत्रणात आहे. दाऊदशी संबंधित सात ठिकाणच्या मालमत्तेचे नवाब मलिक हे मालक आहेत. दाऊद टोळीशी संबंधित मालमत्ता हसिना पारकरचा चालक सलीम पटेल याच्याकडून मलिक कुटुंबियांनी खरेदी केली. त्यामुळे हे प्रकरण आर्थिक गैरव्यवहाराचे असल्याचा दावा ईडीने 14 दिवसांची कोठडी मागताना केला. दाऊद टोळीकडून अनेकांना धमकावून वादातील मालमत्ता बळकावण्यात आल्या होत्या. त्यातील एक पीडित असलेली मुनीरा प्लंबर यांची कुर्ला येथे तीन एकर जमीन होती. सध्या त्याची किंमत 300 कोटी रुपये आहे. ही जागा मलिक आणि हसिना पारकर यांनी बळकावल्याचा मुख्य आरोप आहे.
अधिक मुद्दे वकील मांडतील
दरम्यान, समन्स नसताना अटक करणे योग्य नाही. नवाब मलिक घाबरणारे नेते नाहीत. ईडीला जर माहिती हवी होती तर त्यांनी दिली असती परंतु, तसे न करता एका मंत्र्यांला अशा पध्दतीने घरातून उचलून आणणे योग्य नाही. नवाब मलिक यांची बाजू देशासमोर, राज्यासमोर यावी म्हणून यासंदर्भातील माहिती देत असून अधिक मुद्दे वकील मांडतीलच प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.