महापालिकेच्या कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी अर्ज सादर करा: महिला बालकल्याण समिती सभापती सौ. गीतांजली ढोपे पाटील यांचे आवाहन: 23 फेब्रुवारीपर्यंत दाखल करता येणार अर्ज
सांगली: सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीच्या कर्तृत्ववान महिला पुरस्कार. पुरस्कारासाठी इच्छुक महिलांनी अर्ज सादर करावेत असे आवाहन महिला बालकल्याण समिती सभापती सौ गीतांजली ढोपे पाटील यांनी केले आहे. 23 फेब्रुवारीपर्यंत इच्छुक महिलांनी आपले अर्ज सादर करावेत असे आवाहनही ढोपे पाटील यांनी केले.
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिकेतर्फे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका क्षेत्रातील विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांचा कर्तृत्ववान महिला पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, व्यवसाय/ उद्योग, शौर्य, वृक्ष लागवड व संगोपन, घनकचरा व्यवस्थापन, दिव्यांग उन्नती, वैद्यकीय, पाणी बचत व पुनर्वापर, ऊर्जा बचत व पारंपरिक ऊर्जास्त्रोत यांचा वापर, कृषि, पत्रकारिता, साहित्य, वंचित घटकांचा विकास या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा या माध्यमातून गौरव करण्यात येणार आहे. या प्रत्येक विभागातून सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या प्रत्येकी एका कर्तुत्वान महिलेचा महानगरपालिकेतर्फे पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी अर्ज करणारी महिला ही सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रामधील रहिवासी असावी. याबाबतचा पुरावा अर्जासोबत जोडणे आवश्यक राहणार आहे.
कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी महानगरपालिकेने उपलब्ध करुन दिलेल्या नमुन्यात अर्ज महानगरपालिकेकडे विहित मुदतीत सादर करणे आवश्यक राहील. अर्जासोबत ज्या क्षेत्रातील पुरस्कारासाठी अर्ज केला त्या क्षेत्रात काम केल्या बद्दलचे पुरावे जोडणे आवश्यक राहील.
पुरस्कारासाठी दि. १८ फेब्रुवारी, २०२२ ते दि. २३ फेब्रुवारी, २०२२ पर्यंत कार्यालयीन वेळेत महिलांनी आपले अर्ज दाखल करावेत. पुरस्कारासाठीचे अर्ज हे महिला व बालकल्याण समिती कार्यालय, महानगरपालिका मुख्यालय, सांगली येथे उपलब्ध आहेत. तसेच विहित नमुन्यातील अर्ज हे 23 फेब्रुवारी 2022 या दिलेल्या मुदतीत सादर करावेत, मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत असेही सभापती गीतांजली ढोपे पाटील यांनी सांगितले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.