आज पल्स पोलिओ लसीकरण मोहिम 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना लसीचा डोस देण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
सांगली, दि. 26, : जागतिक आरोग्य संघटनेने सन १९८८ मध्ये पोलिओ निर्मुलनाचे ध्येय निश्चित केले आहे. त्यानुसार सन १९९५ पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ लसीची एक - एक मात्रा दिली जात आहे. त्यास अनुसरून सन २०२२ मध्ये दि. २७ फेब्रुवारी २०२२ रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. तरी दि. २७ फेब्रुवारी २०१७ नंतर जन्मलेल्या सर्व बालकांना दि. २७ फेब्रुवारी २०२२ रोजी जवळच्या बुथवर नेऊन पोलिओ लसीच डोस द्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे व आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेच्या अनुषंगाने जिल्ह्यात दिनांक २७ फेब्रुवारी २०१७ नंतर जन्मलेल्या सर्व बालकांची संगणकीकृत नोंदणी आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी, आशा इत्यादी व्दारे करण्यात आली असून लसीकरणासाठी एकूण 2061 बुथ स्थापन करण्यात आले आहेत. यामध्ये 0 ते 5 वर्षे वयोगटातील ग्रामीण क्षेत्रातील अपेक्षित 17 हजार 260 लाभार्थीसाठी 1 हजार 453 बुथ, शहरी भागातील 17 हजार 372 लाभार्थीसाठी 114 बुथ व महानगरपालिका क्षेत्रातील 53 हजार 834 लाभार्थीसाठी 494 बुथ स्थापन करण्यात आले आहेत. लाभार्थीना २ कि.मी. पेक्षा जास्त अंतर चालत जावे लागणार नाही याची दक्षता घेवून बुथची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक बुथवर दोन ते तीन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून बुथवर लसपाजक, लेखनिक व केंद्रप्रमुख व्यक्ती व स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. लसीकरणाच्या दिवशी सर्व बालकांना लस मिळावी यासाठी जिल्ह्याच्या सर्व सीमा, नाके, एस.टी.स्टँण्ड, रेल्वे स्थानके, टोलनाके इत्यादी ठिकाणी 169 ट्रान्सिट टीम (ग्रामीण 86, शहरी 10 व महानगरपालिका 73) कार्यरत आहेत.
बांधकामाची ठिकाणे, रस्त्याची कामे, खाणकामगार, ऊसतोड कामगार, विटभट्ट्या, मंदिरे, बगीचे, फुटपाथवरील लाभार्थी, तात्पुरत्या व फिरत्या वसाहती, फिरस्ते, प्रसुतीगृहे व खाजगी दवाखाणे, तुरळक वाड्या वस्त्या इत्यादी ठिकाणच्या बालकांच्या लसीकरणासाठी 274 मोबाईल टीम (ग्रामीण 248, शहरी 6 व महानगरपालिका 20) कार्यरत आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.