मोदी सरकारने लादलेल्या काळ्या कायद्यांच्या विरोधातातील २७ च्या शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा सक्रिय पाठिंबा पृथ्वीराज पाटील यांची माहिती
सांगली, दि. २६ : केंद्रातील भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या तीन काळ्या कायद्याच्या विरोधात देशभरातील सर्व शेतकरी संघटना आणि डाव्या आघाडीने सोमवार दिनांक २७ रोजी भारत बंद चे आवाहन केले आहे. त्यामध्ये काँग्रेस पक्ष सक्रिय सहभागी होणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी आज येथे दिली.
ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या विरोधातील तिन्ही जुलमी काळ्या कायद्यांचा विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी आणि संघटनांनी आवाज उठवलेला आहे. दिल्लीमध्ये मागील अकरा महिन्यांपासून ते आंदोलन करीत आहेत. काँग्रेसने वेळोवेळी या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला आहे. शेतकऱ्यांबरोबरच कामगारांनाही बरबाद करणाऱ्या कायद्यांचाही काँग्रेसने विरोध केला आहे. देशातील तरुणांना बेरोजगार करणाऱ्या मोदी सरकारचा आम्ही वेळोवेळी तीव्र निषेध केला आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती खूपच वाढल्या आहेत. या वस्तूंची कृत्रिम महागाई वाढवली आहे.
श्री. पाटील म्हणाले, अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी आणि राहुल गांधी तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष श्री. नाना पटोले यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीमती सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षातील नेत्यांची एक बैठक घेऊन मोदी सरकारच्या या चुकीच्या निर्णयासंदर्भात ठाम भूमिका घेतली होती. या बैठकीला शरद पवार, ममता बॅनर्जींसह विविध पक्षांचे नेते उपस्थित होते. या पार्श्वभूमीवरच शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नावर तसेच महागाईवर झालेल्या आंदोलनाला त्यांनी सक्रिय पाठिंबा दिला आहे. उद्याच्या आंदोलनातही काँग्रेसच्या सर्व कमिट्या, आघाड्या, संघटना, विविध सेल आणि विभागाचे पदाधिकारी, कार्यकर्ते पक्षाचा झेंडा आणि निषेधाचे फलक घेऊन सक्रिय सहभागी होणार आहेत. जिल्ह्यात तालुक्यात व ब्लॉगमधील अत्यावश्यक सेवा वगळता व्यावसायिक बाजारपेठा, शाळा-कॉलेज इत्यादी शैक्षणिक संस्था कडकडीत बंद ठेवून मोदी सरकारच्या प्रवृत्तीचा निषेध केला जाणार आहे.
ते म्हणाले, देशातील जनतेला भरमसाठ खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजपच्या हुकूमशाही राजवटीने आणलेल्या शेतकरीविरोधी तीन काळ्या कायद्यांमुळे संपूर्ण देशाची आर्थिक स्थिती पूर्णतः ढासळली आहे. हे कायदे मागे घ्यावेत म्हणून जगाचा पोशिंदा गेल्या अकरा महिन्यांपासून दिल्लीत ठाण मांडून बसलेला आहे. मात्र या जुलमी सरकारला त्याची कीव येत नाही. उलट त्यांचा क्रूर पद्धतीने छळ केला जात आहे. ही बाब केंद्रातल्या भाजप सरकारसाठी निषेधार्ह आहे. केंद्रातील मोदींच्या कपटी सरकारने या देशातील सर्व सरकारी यंत्रणा ताब्यात घेऊन देश बरबादीचा घाट घातला आहे.
ते म्हणाले, देशातील सर्व सार्वजनिक उपक्रम रेल्वे, बँका, विमान सेवा, रस्ते, विमा कंपन्या, सार्वजनिक उद्योग, दूरसंचार आणि बंदरे इत्यादी एक एक करून विकत आहेत. अलिकडेच विक्री झालेल्या बंदरातून मोठ्या प्रमाणात तस्करी झाली आहे. अदानी यांच्या मालकीच्या गुजरातमधील मुद्रा बंदरातून २१ हजार कोटी किमतीच्या ड्रग्जची तस्करी सापडली आहे. अशा अमली पदार्थांच्या तस्करीतून मोदी सरकार देशातील तरुणाई संपवायला निघाले आहे.
तरुणांना दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देऊ असे आश्वासन देणाऱ्या भाजप सरकारने असलेल्या नोकऱ्याही संपुष्टात आणल्या आहेत. या अशा मार्गाने देशातला तरुण बेरोजगार करून त्याला देशोधडीला लावण्याचा प्रयत्न मोदींच्या कटकारस्थानी सरकारकडून सातत्याने सुरू आहे. त्याचप्रमाणे दिवसेंदिवस कृत्रिम महागाई निर्माण करून अदानी - अंबानीसारख्या उद्योगपतींचे खिसे भरण्याची खेळी मोदी सरकारकडून सुरू आहे. या महागाईच्या झळीत सर्वसामान्य जनता होरपळून निघाली आहे. एकीकडे खोट्या विकासाच्या मोठमोठ्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे महागाई वाढवून देशातल्या सर्व संवैधानिक संस्था ताब्यात घेऊन सार्वजनिक संस्था विकून शेतकरी व सर्वसामान्यांना देशोधडीला लावण्याचे पाप भाजप सरकार करीत आहे. या जुलमी व अत्याचारी भाजपा सरकारच्या विरोधात या सर्व शेतकरी संघटना उतरल्या आहेत. त्यात काँग्रेसही आघाडीवर आहे, असेही ते म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.