शांतिनिकेतन लोकविद्यापीठ म्हणजे शौर्यगाथा सांगणारे प्रेरणास्थान जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांची भावना; रणगाडा लोकार्पण
माधवनगर : अनेक क्षेत्र गाजवणारे विद्यार्थी शांतिनिकेतन लोकविद्यापीठाने घडवले. क्रीडा क्षेत्रात शांतिनिकेतनचा नावलौकिक खुप मोठा आहे. अनेक युध्दात पराक्रम गावजलेला रणगाडा आता शांतिनिकेतनमध्ये आल्याने हे विद्यापीठ शौर्यगाथा सांगणारे प्रेरणास्थान बनले आहे, अशी भावना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी व्यक्त केली.
1966 मध्ये भारतीय सेना दलात आलेला आणि त्यानंतर 1971 च्या पाकीस्तान युध्दात अनेक कामगिरीमध्ये सहभागी झालेला टी-55 बॅटल टैंक (रणगाडा) शांतिनिकेतन लोकविद्यापीठामध्ये स्थापित करण्यात आला. आज जिल्हाधिकारी डॉ.चौधरी यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. नवभारत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विशाल पाटील, कार्याध्यक्ष गणपतदादा पाटील, ब्रिगेडियर सुरेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
आपल्या मुलांना घेऊन शांतिनिकेतनमध्ये या. हा रणगाडा त्यांना दाखवा. त्यांची शौर्यगाथाही मुलांना सांगा. त्याची प्रेरणा घेऊन आपली मुलं लष्कारात गेली तर ती देशसेवाच ठरेल अशी भावनाही जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी व्यक्त केली.
संस्थेचे विश्वस्त ब्रिगेडीयर सुरेश पाटील यांनी या रणगाड्याविषयी माहिती दिली. ते म्हणाले, 1971 च्या पाकीस्तान युध्दामध्ये पश्चिम बॉर्डरवर 36 इन्फन्टरी डिव्हीजनच्या शिंदे हॉर्स युनिटने 8 डिसेंबर 1971 रोजी शक्करगढच्या बाजुने चढाई केली होती. 10 डिसेंबर 1971 रोजी भारतीय सैन्याने शत्रूचे आठ टैंक नष्ट केले होते. या युध्दात शिंदे हॉर्सला एक महावीर चक्र, दोन वीर चक्र, एक सेना मेडल आणि चार मेनशन इन डिसपॅचेस ने सन्मानित करण्यात आले होते. असा वैशिष्टपूर्ण टी-55 बॅटल टैंक युवावर्गाला राष्ट्रप्रेमाबाबत प्रेरीत करण्याच्या उद्देशाने ट्राफीच्या स्वरुपात नवभारत शिक्षण मंडळाला सुपूर्द करण्यात आला असून युध्दातील रणसामुग्रीचे स्मृतीस्थल शांतिनिकेतनमध्ये तयार करण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. पंजाबचे एस.एम. व्ही.एस.एम. मेजर जनरल आर. व्ही. सिंग, सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. चौधरी, उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांचे याकामी सहकार्य मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
स्वागत संस्थेचे संचालक गौतम पाटील यांनी केले. संस्थेचे संस्थापक प्राचार्य डॉ. पी.बी.पाटील, प्राचार्या सरोज पाटील यांचे स्वप्न आज पुर्ण झाल्याची भावना व्यक्त केली. देशसेवेने प्रेरीत होणारी नव विचारांची पिढी शांतिनिकेतन घडवत असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
सुत्रसंचालन महेश पाटील यांनी केले तर आभार अशोक सावंत यांनी मानले. कार्यक्रमास सनतकुमार आरवाडे, विनया घोरपडे, अॅड. सतिश पाटील, संस्थेचे उपसंचालक बी. आर.थोरात, डी.एस.माने, प्रशासकीय अधिकारी एम.के.आंबोळे यांच्यासह कार्यकारिणीचे सर्व सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नागरीक उपस्थित होते.
मराठी मुलं अधिकारी कधी होणार असा सवाल ब्रिगेडीयर सुरेश पाटील यांनी केला. काहीच येत नाही म्हणून मुलाला मिलीटरीत घालायचे ही मानसिकता बदला. महाराष्ट्रात एनडीए आहे पण एनडीएमध्ये महाराष्ट्र कुठं आहे याचा विचार करा. मराठी मुलांना सैन्यदलात अधिकारी व्हायच्या खुप संधी आहेत. त्याचा फायदा घ्यायला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
जरंडीचे प्रतापराव शिंदे हे सैन्यदलातून निवृत्त झालेले जवान. हा रणगाडा चालवायलाही ते होते. जेव्हा हा रणगाडा सांगलीत शांतिनिकेतनमध्ये आल्याचे त्यांना समजले तेव्हा त्यांनी मेरा साथी आ गया असे म्हणत गावभर साखर वाटली. अशा प्रेरणाबळ असलेला हा रणगाडा आता नव्या पिढीचे प्रेरणास्थान ठरेल, अशी भावना गौतम पाटील यांनी व्यक्त केली.
फोटो ओळ:
शांतिनिकेतन लोकविद्यापीठमध्ये रणगाडा लोकार्पण सोहळ्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, सोबत सनतकुमार आरवाडे, ब्रिकेडियर सुरेश पाटील, गणपतदादा पाटील, गौतम पाटील, अॅड. सतिश पाटील.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.