Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या कमला भसिन यांचे निधन

 लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या कमला भसिन यांचे निधन


नवी दिल्ली : आज पहाटे प्रख्यात स्त्रीवादी कार्यकर्त्या आणि लेखिका कमला भसिन यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती मानवतावादी कार्यकर्त्या कविता श्रीवास्तव यांनी दिली आहे. कमला भसिन यांच्या निधनामुळे स्त्रीवादी चळवळीचा आवाज हरपला असून चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे.

कमला भसिन यांनी दक्षिण आशियातील स्त्रीवादी चळवळीला आकार आणि दिशा देण्याचे काम केले. कमला भासिन यांनी आपल्या कामाच्या आणि लेखनाच्या माध्यमातून लैंगिक भेदभाव, स्त्री शिक्षण, मानवाधिकार यासारख्या विषयांवर सातत्याने आवाज उठवला. त्यांनी नाटक, गीत आणि कलेच्या माध्यमातूनही समाज जागरुकतेचे काम केले. पितृसत्ताक समाज व्यवस्थेमध्ये स्त्रियांना मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीवर कमला भसिन यांनी सातत्याने टीका केली आणि त्यावर विपूल लेखन केले.

कमला भसिन यांच्या निधनावर अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या शबाना आझमी यांनीही शोक व्यक्त केला आहे. भविष्यातील स्त्रीवादी चळवळीला कमला भसिन यांची उणीव नक्कीच जाणवणार असल्याचे त्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.

1970 च्या दशकात कमला भसिन यांनी स्त्रीवादी चळवळीसाठी काम सुरु केले. त्यांनी 2002 साली स्त्रीवादी नेटवर्क असलेले 'संगत'ची स्थापना केली. त्यांनी या माध्यमातून ग्रामीण आणि आदिवासी महिलांच्यासाठी काम केले. कमला भसिन यांनी लिहिलेल्या अनेक स्त्रीवादी पुस्तकांचे 30 हून जास्त भाषांमध्ये भाषांतर करण्यात आले आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.