गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात मोठी घसरण...
मुंबई : सोनं हा भारतीयांसाठी जीव की प्राण समजला जातो. सोन्याचे दागिने घालून मिरवणं एवढंच नव्हे तर एक उत्तम गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करण्याकडे भारतीयांचा मोठा कल असतो. त्यामुळे जगभरातील मार्केटपैकी भारत हे सोन्यासाठी सर्वात मोठं मार्केट मानलं जातं.
भारतात सोन्याचा बाजार नेहमीच गरम असतो. मात्र, गेले दोन दिवस सोन्याच्या दरात मोठी घसरण झालेली पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसात प्रती तोळा सोन्याच्या दरात तब्बल 250 रुपयांची घट झाली आहे. 250 रुपयांंच्या घटीसह सध्या मुंबईतील सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर 46 हजार 30 रुपये प्रती तोळा आहे.
सोन्याच्या दरात जरी घट झाली असली तरी चांदीच्या दरात मात्र आज वाढ झाली आहे. आज प्रती किलो चांदीमागे तब्बल 350 रुपयांची वाढ झाली आहे. 350 रुपयांच्या वाढीसह सध्या मुंबईतील सराफा बाजारात चांदीचा दर 60 हजार 450 रुपये प्रती किलो आहे.
दरम्यान, सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही सोन्याच्या दरावर प्रभाव टाकत असल्याचं दिसून येतं. बहुतांशवेळा इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडूनच सोन्याचा दर ठरवला जातो. त्यामध्ये स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.