Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पवित्र पोर्टल रद्द करा अन्यथा आव्हान याचिका दाखल करु.. अशोक थोरात, उपाध्यक्ष

 पवित्र पोर्टल रद्द करा अन्यथा आव्हान याचिका दाखल करु.. अशोक थोरात, उपाध्यक्ष 


सांगली दि. २९:खासगी शिक्षण संस्थांच्या शाळामधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा अधिकार हा कायद्याने व विविध उच्च न्यायालये व सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार खासगी शिक्षण संस्थांचा आहे,पवित्र पोर्टल मधून होणारी भरती प्रक्रिया शासनाने तात्काळ रद्द करावी अन्यथा महामंडळाकडून विभागीय स्तरावर उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली जाईल असा ईशारा देवरुख येथे झालेल्या महामंडळाच्या कोल्हापूर विभागीय बैठकीत दिल्याचे महामंडळाचे उपाध्यक्ष अशोकराव थोरात यांनी सांगितले.

शासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला परंतु कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी शाळांकडे आर्थिक तरतूद नाही. केंद्र व राज्य सरकार कडे कोरोना प्रतिबंधक सदराखाली जमलेल्या निधीतून शाळांना भरीव आर्थिक मदत द्यावी व कोरोना साथ नियंत्रणाच्या सर्व मार्गांचा काटेकोर अवलंबासाठी शासनाने कडक नियंत्रण करुन विद्यार्थी व शिक्षकांच्या आरोग्याच्या बाबतीत पुरेशी काळजी घ्यावी, गेली दोन वर्षे जे तुटपुंजे वेतनेतर अनुदान आहे तेही मिळाले नाही. शाळा चालवणे कठीण झाले आहे. शासनाने थकीत सन २०२०-२१ व सन २०२१-२२ चा वेतनेतर अनुदानाचा पहिला हप्ता तातडीने सर्व शाळांना अदा करावा तसेच शाळेत शिक्षकेतर पदांची भरती न झाल्याने शालेय प्रशासन कोलमडून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. व्यपगत केलेली शिपाई पदे पुनर्जिवीत करुन ही भरती प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच वेतनश्रेणीवर करण्याची संस्थाना परवानगी द्यावी असे ठराव संमत करण्यात आले. या बैठकीत कोल्हापूर विभागातील सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उर्वरित सर्व शिक्षण संस्थांना जिल्हा संघाचे सभासद करुन घेण्याची मोहीम कोल्हापूर विभागाच्या मार्गदर्शनाखाली वजिल्हा संघांच्या वतीने गतीमान करण्याचे ठरले.

यावेळी महामंडळाचे खजिनदार रावसाहेब पाटील यांनी शिक्षण संस्थांचे अस्तित्व व बहुजन समाज शिक्षण वाचविण्यासाठी शिक्षण संस्थांचे संघटन मजबूत करणे अनिवार्य आहे.. त्यासाठी जिल्हा संघ बळकट करण्यासाठी झाडून सगळ्या शिक्षण संस्था या त्या त्या जिल्हा संघाचे आजीव सभासद करण्याची मोहीम तीव्र करु या असे आवाहन केले व आवश्यक त्या वेळी न्यायालयीन व रस्त्यावरची लढाई करुन शिक्षण संस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी महामंडळ कटीबध्द असल्याचा पुनरुच्चार केला.रत्नागिरी जिल्हा संघाचे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी संस्थांना भेडसावणाऱ्या समस्यांचा आढावा घेऊन शिक्षण संस्थांनी मूल्य शिक्षणावर भर देऊन शाश्वत शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष शिवाजी माळकर व संघटक नंदकुमार ईनामदार यांनी संस्था संघटन व सभासद मोहिमेवर भर देणार असल्याचे सांगितले.

या बैठकीत संमत झालेले ठराव शासनाकडे तातडीने पाठविण्याचे ठरले.

यावेळी  अशोकराव थोरात, रावसाहेब पाटील, शिवाजी माळकर, पुंडलिक जाधव, सदानंद भागवत, विनोद पाटोळे व कोल्हापूर विभागातील संस्था प्रतिनिधी उपस्थित होते.रावसाहेब यांचे स्वागत करताना भागवत सर अशोक थोरत व इतर.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.