Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जलजीवन मिशन अंतर्गत नवीन 58 नळ पाणी पुरवठा योजनांसाठी 61 कोटीहून अधिक रक्कमेच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता 28 विंधन विहीरीवरील लघु नळ पाणी पुरवठा योजनांसाठी प्रशासकीय मान्यता देण्याची कार्यवाही सुरू

जलजीवन मिशन अंतर्गत नवीन 58 नळ पाणी पुरवठा योजनांसाठी 61 कोटीहून अधिक रक्कमेच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता  28 विंधन विहीरीवरील लघु नळ पाणी पुरवठा योजनांसाठी प्रशासकीय मान्यता देण्याची कार्यवाही सुरू


सांगली, दि. 30,  : जल जीवन मिशन अंतर्गत तांत्रिक छाननी समितीने तत्वत: मान्यता दिलेल्या 81 गावांच्या नळ पाणी पुरवठा योजनांपैकी 58 नळ पाणी पुरवठा योजनांना तांत्रिक मान्यता प्रदान करण्यात येवून जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीव्दारे 58 योजनांना अंदाजित 61 कोटी 39 लाख रूपये इतक्या रक्कमेच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. जिल्हा पाणी पुरवठा व स्वच्छता मिशन समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एम. कदम उपस्थित होते. 

या योजनांमधून 8 हजार 982 इतक्या नळ जोडण्या देण्यात येणार आहेत. तसेच 28 विंधन विहीरीवरील लघु नळ पाणी पुरवठा (Solar Dual Pump) योजनांना 2 कोटी 1 लाख रूपयांची तांत्रिक मान्यता प्रदान करून प्रशासकीय मान्यता देण्याची कार्यवाही ग्रामपंचायतीमार्फत सुरू आहे. लघु नळ योजनांमधून 450 नळ जोडण्या देण्यात येणार आहेत. 

ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन 2024 पर्यंत हर घर नल से जल (FHTC- Functioanal Household Tap Connection) प्रमाणे पाणी पुरवठा करण्यास शासन कटिबध्द आहे. सन 2024 पर्यंत राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तीक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान 55 लिटर्स प्रति दिन, गुणवत्तापुर्ण पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे. 

सांगली जिल्ह्यामध्ये एकुण 726 गावे व 699 ग्रामपंचायती अंतर्गत ग्रामीण भागातील नागरीकांना हातपंप, विंधन विहीर वीजपंप, सोलरपंप, स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना व प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना या माध्यमातून केंद्र शासनाच्या नविन धोरणानुसार जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत 55 लिटर्स प्रमाणे प्रति माणसी प्रति दिनी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी सन 2021-22 चा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. आराखड्यामध्ये जिल्ह्यातील 718 योजनांचा समावेश असून अंदाजित 819 कोटी 44 लाख रूपये इतक्या किंमतीचा आराखडा पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे शासनास सादर करून मंजूर करण्यात आला आहे. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची सुविधा जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व भूजल सर्वेक्षण यंत्रणा या यंत्रणा मार्फत पुरविण्याचे शासनाचे निर्देश आहेत.


जल जीवन मिशन अंतर्गत सांगली जिल्ह्यामध्ये एकुण 4 लाख 45 हजार 841 इतकी कुटुंब संख्या असून त्यापैकी मार्च 2021 अखेर 2 लाख 69 हजार 783 कुटुंबांना घरगुती नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला आहे. उर्वरीत 1 लाख 76 हजार 58 इतक्या कुटुंबांना जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत 55 लिटर्स प्रती दिन प्रती माणसी या दराने पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आलेले असून त्यापैकी मार्च 2022 अखेर एकुण 96 हजार 847  कुटुंबांना घरगुती नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी दि. 28 सप्टेंबर 2021 अखेर 2 हजार 450 नळ जोडण्यांचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. सन 2021-22 चे 100 टक्के उद्दिष्ट मार्च 2022 पर्यंत पुर्ण करण्याचे नियोजन आहे.  तसेच सन 2023 पर्यंत पुर्ण जिल्ह्यामध्ये 100 टक्के घरगुती नळ जोडण्या पुर्ण करण्यात येणार आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.