राज्यात नितिशा जगतापची 21व्या वर्षीच UPSC परीक्षेत यश.
लातूर : यूपीएससी नागरी सेवा 2020 चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत महाराष्ट्रातून 100 पेक्षा अधिक परीक्षार्थींनी यश संपादन केलं आहे. मुळची लातूरची असलेली नितीशा जगताप हिचं या परीक्षेतलं यश पाहता तिचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. अवघ्या 21 व्या वर्षी तिने देशातली सगळ्यात अवघड समजली जाणारी UPSC परीक्षा तिने क्रॅक केलीय. अनेक जणांना 21 व्या वर्षी आयुष्याची दिशाही कळत नाही. पण लातुरच्या या लेकीने 21 व्या वर्षी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन तरुणाईसमोर आदर्श निर्माण केलाय.
पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक!
नितीशाच्या घरची परिस्थिती फार काही बरी नाही. वडील एलआयसी एजंट तर आई गृहिणी. पण नितीशाच्या मनात लहानपणापासून शिक्षणाची जिद्द होती. मोठं होऊन अधिकारी बनण्याचं तिचं स्वप्न होतं. त्या स्वप्नांना आई वडिलांनी खतपाणी घातलं. केवळ शिक्षणासाठी तिची आई तिच्याबरोबर पुण्यात राहायला आली. लेकीनेही अभ्यासात कोणतीच कसर ठेवली नाही. प्रामाणिक प्रयत्न असेल तर यशदेखील पिंगा घातलं, हे नितीशाने दाखवून दिलं. अवघ्या 21 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात तिने यशाला गवसणी घातली.
प्लॅन करुन अभ्यास केला!
पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेत असताना दुसऱ्या वर्षापासून मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला. माझ्याकडे चार वर्ष होती. त्या चार वर्षात मी पूर्ण प्लॅन करुन अभ्यास केला. अपेक्षित यश मिळालं. आजतरी या यशावर विश्वास ठेवणं मला कठीण जातंय. पण शेवटी कष्टाचं फळ मिळालं, एवढं मी म्हणेन, अशी पहिली प्रतिक्रिया नितीशा जगताप हिने दिलीय.
माझं सगळं शिक्षण पुण्यात झालं. प्राथमिक शिक्षण डीएसके स्कूलमधून आणि बारावीनंतरचं शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयातून घेतलं. बीए सायकॉलॉजी करत असताना दुसऱ्या वर्षी मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्याचं ठरवलं. तयारी पुण्यातच केली. परवाच माझी मुलाखत झाली आणि काल संध्याकाळी माझी निवड झाली, ही फिलिंग भारी होती, असं नितीशा म्हणाली.
मुलाखतीचा अनुभव कसा होता?
पॅनेल मेंबर खूप इंटरॅक्टिव्ह होते. त्यामुळे मुलाखतीचा अनुभव छान होता. एकदोन प्रश्न मला येत नव्हते. मी तसं त्यांना क्लिअर सांगितलं. पण बहुतेक प्रश्नांची उत्तरं मी त्यांना दिली, असा मुलाखतीचा अनुभव नितीशाने सांगितला.
मुलीच्या यशाने आई वडिलांना आभाळ ठेंगणं!
लहाणपणापासून ती खूप हुशार होती. फोकस होती. पुढे जाऊन काय करायचंय, हे तिनं ठरवलेलं होतं. अभ्यास कर, असं तिला कधीच सांगावं लागलं नाही. आमचा सपोर्ट तर होताच, वडिलांनी छान पद्धतीने मार्गदर्शन केलं, अशी प्रतिक्रिया नितीशाच्या आईने दिली.
कुटुंबाचा छान सपोर्ट होता. पहिल्याच प्रयत्नात माझी मुलगी यशस्वी होईल, याचा विश्वास होता. तो विश्वास तिने सार्थ ठरविला. खूप छान वाटतंय, असं नितीशाच्या बाबांनी सांगितलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.