जत तालुक्यातील उमदी ते विजापूर रस्त्यावर एका सराफाची कार अडवून त्याला काठ्या, रॉडने मारहाण करत त्याच्याकडील तीन लाखांची रोकड, सोन्याची अंगठी, आयफोन, कार घेऊन पसार झालेल्या सात जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून अडीच कोटींची रोकड, कार असा 2.56 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सांगली एलसीबीने ही कारवाई केल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली. यातील रोकडबाबत आयकर विभागाला कळवण्यात आले असून ती रोकड कोणाची आहे याचा तपास सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.
रवी तुकाराम सनदी (वय ४३, रा. माळी वस्ती, उमदी), अजय तुकाराम सनदी (वय ३५, रा. माळी वस्ती, उमदी), चेतन लक्ष्मण पवार (वय 20, रा. इंडी रोड, विजयपूर, कर्नाटक), लालसाब हजरत होनवाड, (वय -२४, रा. उमदी), आदिलशाह राजअहमद अत्तार (वय २७, रा. उमदी), सुमित सिद्धराम माने, वय २५ वर्षे, रा. पोखणी, ता. उत्तर सोलापूर), साई सिद्ध जाधव (वय १९, रा. उमदी, ता. जत) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दि. 15 रोजी उमदी येथील सराफ व्यावसायिक अनिल कोडग कारमधून विजापूर रस्त्याने निघाले होते. त्यावेळी 8 जणांनी त्यांची कार अडवली. कोडग यांना काठ्या, रॉडने मारहाण करून त्यांच्याकडील तीन लाखांची रोकड, अंगठी, आयफोन तसेच कार घेऊन पसार झाले होते. घटनेची माहिती मिळताच एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतिश शिंदे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. तपासाची सूत्रे वेगाने फिरवण्यात आली.
पथकातील संदीप नलवडे, अनिल कोळेकर यांना यातील संशयित कोणत्याव बोबलाद येथील झेंडे वस्ती परिसरात असल्याची माहिती मिळाली. तेथून पथकाने सनदी बंधू, चेतन पवार यांना ताब्यात घेतले. त्यांनी कार चालकाला लुटल्याची कबुली दिली. नंतर होणवाड, अत्तार, माने यांना ताब्यात घेण्यात आले. नंतर पथकाने सनदी यांच्या विजापूर येथील घरात छापा टाकून अडीच कोटींची रोकड जप्त केली. तसेच कोडग यांची कारही जप्त करण्यात आली. सातही जणांना अटक करण्यात आली असून त्यांना 6 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
ड्रायव्हरच्या मुलाने दिली टीप
कोडग यांच्या कारवर सिद्ध जाधव ड्रायव्हर म्हणून काम करतात. त्यांचा मुलगा साई हा कोडग यांच्याकडे काम करत होता. कोडग नेहमीच कारमधून रोकड घेऊन जातात याची त्याला माहिती होती. मंगळवारी ते कारमधून रोकड नेत असल्याची माहिती त्यानेच अन्य साथीदारांना दिली होती. त्यानंतर लूटमारीची ही घटना घडली.
चोरीला गेलेल्या रोकडहुन अधिकची रक्कम आली कोठून कोडग यांनी घटना घडल्यानंतर तीन लाखांची रोकड चोरल्याची फिर्याद दिली होती. मात्र संशयितांकडून अडीच कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. ती रोकड कोणाची आहे याचा तपास सुरु असून या रकमेबाबत आयकर विभागाला कळवले असल्याचे अधीक्षक घुगे यांनी सांगितले. दरम्यान यातील सुमित माने हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर पुणे शहरात गुन्हे दाखल आहेत.पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अतिरिक्त अधीक्षक रितू खोकर, जतचे उपाधीक्षक सुनिल साळुंखे, एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक सतिश शिंदे, सहायक निरीक्षक नितीन सावंत, उमदीचे सहायक निरीक्षक संदीप कांबळे, रुपाली बोबडे, उपनिरीक्षक बंडू साळवे, अनिल कोळेकर, महादेव नागणे, अमर नरळे, सागर लवटे, संदीप गुरव, मछिंद्र बर्डे, आमसिद्ध खोत, संदीप नलवडे, उदय माळी, उमदी पोलीस ठाण्यातील संतोष माने, कपिल काळेल, सोमनाथ पोटभरे, इंद्रजित घोदे, कावेरी मोटे, कॅप्टन गुंडवाडे, अजय पाटील, विजय पाटणकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.