Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वाळूची चोरटी वाहतूक करणारा डंपर जप्त : महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई

वाळूची चोरटी वाहतूक करणारा डंपर जप्त : महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई
 

वाळूची बेकायदेशीररित्या चोरटी वाहतूक करणारा डंपर जप्त करून त्याच्या चालकाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी जयसिंगपूर येथील मालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी चार ब्रास वाळू, डंपर असा 8.24 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिली.

गोविंद गंगाप्पा राठोड (वय ४२, रा. धरणगुत्ती, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर प्रविण देसाई, (रा. जयसिंगपूर, जि. कोल्हापूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा, चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना सहायक निरीक्षक शिंदे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. शाखेतील नाना चंदनशिवे यांना हनुमान मंदिर ते माधवनगर रस्त्यावरून वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती खबऱ्याद्वारे रात्री उशिरा मिळाली.

त्यानंतर पथकाने सापळा रचून एक डंपर (एमएच 51 सी 2755) अडवला. पथकाला पाहून चालक राठोड याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाने शितफिने त्याला पकडले. डंपरची तपासणी केल्यावर त्यामध्ये चार ब्रास वाळू सापडली. राठोडकडे कसून चौकशी केल्यावर त्याने डंपर मालक देसाई यांच्या सांगण्यावरून ही वाहतूक करत असल्याची कबुली दिली. वाळूने भरलेला डंपर जप्त करून त्याला अटक करण्यात आली. जयसिंगपूर येथील प्रवीण देसाई याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक रुपाली गायकवाड, श्रेणी उपनिरीक्षक धनंजय चव्हाण, नानासाहेब चंदनशिवे, महेश मासाळ, श्रेणी उपनिरीक्षक सतीशकुमार पाटील यांनी ही कारवाई केली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.