आटपाडी : चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना काही पोलीस अधिकारी पदाचा गैरवापर करून बेकायदेशीरपणे सोने रिकव्हरी आणि वसुली करून सराफांना त्रास देतात, असा आरोप सराफ संरक्षण समितीने केला आहे. याबाबत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष
पोलीस महानिरीक्षक यांना निवेदन देत समितीने त्या अधिकाऱ्यांवर कारवाई
करावी, अशी मागणी केली आहे. यावेळी सराफ आणि सुवर्णंकार संरक्षण समितीचे
प्रदेशाध्यक्ष उमेश बुऱ्हाडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जगदीश कांबळे,
उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष गणेश टाक, पुणे जिल्हाध्यक्ष प्रथमेश नगरकर,
अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष ओंकार गटगिळे, गणेश मैड, हितेश पंडित, सोमनाथ
अवताडे, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख उमेश बागडे, पीडित सराफ आणि पदाधिकारी
उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यातील पुणे, पाटस, यवत, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर आणि वैराग, सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील सराफांना वेठीस धरून त्यांच्याकडुन सक्तीची वसुली करण्यात आली आहे. यासंदर्भात संबंधित जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे. परंतु अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही, असे या निवेदनात म्हटले आहे. या घटनांचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांचे पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य रेकॉर्डची मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावी. भ्रष्ट, बेजाबबदार तपास अधिका-यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशीही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.