सख्खा भाऊच झाला पक्का वैरी!; चिंचोलीत लहान भावानेच केला मोठ्या भावाचा खून, वेगळचं कारण आलं समोर?
सांगोला : दारूच्या नशेत सतत आई-वडिलांना शिवीगाळ व त्रास करणाऱ्या मोठ्या भावाचा लहान भावानेच धारदार शस्त्राने खून केल्याची खळबळजनक घटना चिंचोली (ता. सांगोला) येथे घडली. ही घटना १६ एप्रिल रोजी सकाळी १०.४० च्या सुमारास शिवरत्न पेट्रोल पंपाजवळ मनोहर घाडगे यांच्या शेतालगत घडली. कार्तिक नामदेव यादव (वय २८, रा. चिंचोली, ता. सांगोला) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
वडील नामदेव रावसाहेब यादव (वय ५०, रा. चिंचोली) यांनी दिली आहे. कार्तिक नामदेव यादव (वय २८) हा दारूच्या नशेत वारंवार आपल्या आई-वडिलांना शिवीगाळ करत होता. आई-वडिलांना दारूच्या नशेत मोठा भाऊ सतत त्रास देत असल्याने लहान भाऊ तुषार वैतागला होता. बुधवारी (ता. १६) १०.४० वाजण्याच्या सुमारास कार्तिक यादव हा वडील नामदेव व आई नंदा यांना दारू पिऊन शिवीगाळ करीत होता.
सततच्या शिवीगाळ करण्याच्या प्रकारामुळे वैतागलेल्या तुषार नामदेव यादव (वय २५) याने रागाच्या भरात चाकूसारख्या धारदार शस्त्राने कार्तिकच्या डाव्या बाजूच्या बगलेत भोसकून खून केला. या प्रकरणी नामदेव रावसाहेब यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सांगोला पोलिसांनी तुषार यादव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तुषार यादवला अटक केली आहे.
तुषारनेच सांगितले 'मी कार्तिकचा भोसकून खून केला'
फिर्यादी नामदेव यादव यांच्या मेव्हण्याचा मुलगा विकास इंगळे (रा. चिंचोली) हे व त्यांच्यासोबत उत्तम ढेरे, अविनाश भोसले, रोहन होवाळ हे शिवरत्न पेट्रोल पंपाजवळ थांबले असताना तुषार व कार्तिक या भावांची मारामारी सुरू झाली. तुषार हा तेथून घराकडे निघाला असताना कार्तिक यास, "तू आई-वडिलांना शिव्या देतो, थांब तुला बघून घेतो" असे म्हणत तो रागाने घरी निघून गेला. दोघांमध्ये कोणतीही घटना होऊ नये म्हणून विकास इंगळे व त्याच्यासोबत असणारे त्यांच्या घराकडे निघाले असताना शंभर मीटर अंतरावरच तुषारच्या हातामध्ये रक्ताने माखलेले हत्यार दिसले. तुषार त्यांना मी कार्तिक याचा खून केला आहे असे बोलून पुढे रस्त्याने निघून गेला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.