Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पोलीस उपनिरीक्षकाला 30 हजारांची लाच स्विकारताना रंगेहात पकडले; 'एसीबी'ची कारवाई

पोलीस उपनिरीक्षकाला 30 हजारांची लाच स्विकारताना रंगेहात पकडले; 'एसीबी'ची कारवाई
 

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, पिंपरी पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षकास 30 हजार रुपयांची लाच स्वीकारताना 'एसीबी'ने सापळा रचत मंगळवारी 15 एप्रिल रोजी रंगेहात पकडले. निलेश बोकेफोडे (वय 38 वर्ष , पद पोलीस उप निरीक्षक, पिंपरी पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय, पुणे. (वर्ग- 2, अराजपत्रित) असे कारवाई केलेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. या प्रकरणी एका 24 वर्षीय तरुणाने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे फिर्याद दिली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या विरुद्ध पिंपरी पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यात त्यांना मदत करण्यासाठी व नमूद गुन्ह्यात तक्रारदाराचे जप्त करण्यात आलेले वाहन सोडविण्यासाठी उपनिरीक्षक निलेश बोकेफोडे यांनी तक्रारदाराकडे 40 हजार रुपयाची लाच मागणी केली. त्यानंतर 24 वर्षीय तरुणाने दि. 11 एप्रिल 2025 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे याबाबत तक्रार दिली होती.
प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने दि. 11 एप्रिल 2025 व दि. 12 एप्रिल 2025 रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता, लोकसेवक निलेश बोकेफोडे यांनी तक्रारदाराविरुद्ध दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी व गुन्ह्यात जप्त केलेले वाहन सोडविण्यासाठी सुरुवातीला 40 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 30 हजार रुपये लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

आज दि. 15 एप्रिल 2025 रोजी लोकसेवक निलेश बोकेफोडे यांना तक्रारदाराकडून पिंपरी पोलीस स्टेशन अंतर्गत मोहन नगर पोलीस चौकी येथे 30 हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्या विरुद्ध पिंपरी पोलीस स्टेशन, पिंपरी-चिंचवड आयुक्तालय येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्र, पुणे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे(एसीबी) पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर (लाप्रवि) पुणे तपास करत आहेत.

पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांचे आवाहन…
लोकसेवक शासकीय अधिकारी / कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसम (एजंट) हे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास त्याबाबत तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमूद क्रमांकवर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे (एसीबी) पुणे यांनी केले आहे.

1) अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे दुरध्वनी क्रमांक 020 26122134, 261328o2, 26050423

2) व्हॉट्स अॅप क्रमांक मुंबई – 9930997700

3) ई-मेलआयडी पुणे dyspacbpune@mahapolice.gov.in

4) वेबसाईट www.acbmaharashtra.gov.in

5) ऑनलाईन अॅप तक्रार www.acbmaharashtra.net.in




➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.