Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आता वाहनचालकांची होणार 'अमली पदार्थ' चाचणी; राज्य सरकारचा निर्णय

आता वाहनचालकांची होणार 'अमली पदार्थ' चाचणी; राज्य सरकारचा निर्णय
 

मुंबई : राज्यातील अपघातांचे वाढते सत्र लक्षात घेता, राज्य सरकारने अपघात रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत वाहनचालकांची मद्यपान तपासणी केली जात होती; मात्र त्यात चालकाने अंमली पदार्थ सेवन केल्याचे कळत नव्हते. त्यामुळेच आता वाहनचालकाने अंमली पदार्थ सेवन केले आहे का नाही, याची चाचणी होणार आहे. परिवहन विभागातर्फे लवकरच चालकांची अमली पदार्थ सेवन चाचणी सुरू करण्यात येत असल्याचे सूतोवाच परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत केले.

वाहनचालकांची मद्यपान चाचणी करण्यासाठी 'ब्रेथ ॲनालायझर'चा वापर करण्यात येतो. त्यावर परिवहन विभाग आणि वाहतूक पोलीस यांच्याकडून विशेष मोहिमेद्वारे चाचणी केली जात होती. संबंधित वाहनचालकांवर कारवाई केली जात होती. अलीकडे काही वाहनचालकांनी कारवाई होऊ नये म्हणून मद्यपानाऐवजी अमली पदार्थ सेवन केल्याचे दिसून आले आहे. त्याला लगाम घालण्यासाठी ही चाचणी होणार आहे. या चाचणीमुळे चालकांचे मद्यप्राशन किंवा अमली पदार्थांच्या प्रभावाखाली वाहन चालविण्याचे प्रमाण कमी होईल, अपघातांचे प्रमाण कमी होईल, सार्वजनिक वाहतुकीत सुरक्षिततेची खात्री होईल आणि प्रवाशांना सुरक्षित आणि सुखकर प्रवासाची हमी मिळेल, अशी अपेक्षा असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.
वर्षभरात चाचणी सुरू होणार

वाहनचालकांची अमली पदार्थ सेवनाबाबत चाचणी केली जाणार आहे, त्याबाबत सध्या अभ्यास सुरू आहे. त्यासाठी निविदा मागविण्यात येणार असून वर्षभरात ही चाचणी सुरू होणार आहे, असे परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी सांगितले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.