Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सत्य जगतधर्म 'इस्लाम' सर्व मुस्लिम बांधवना ' सांगली दर्पण' परिवाराकडून ईद मुबारक

सत्य जगतधर्म 'इस्लाम' सर्व मुस्लिम बांधवना ' सांगली दर्पण' परिवाराकडून ईद मुबारक
 

इस्लामला 'दिन ए फितरत' अर्थात प्राकृतिक धर्म म्हटले जाते. याचे कारण म्हणजे, निसर्ग नियम, प्रकृती आणि मानवी प्रवृत्ती यांची योग्य सांगड व संतुलन यामध्ये साधलेले आहे. इतर सजीव व प्राणिमात्रांप्रमाणे मानवही समूहाने राहणारा व सहजीवनाचा आनंद घेणारा प्राणी आहे; परंतु सृष्टी व जीवनाचे विशेष औदार्य मनुष्यमात्रास लाभलेले आहे. त्यामुळे मानवास पृथ्वीतलावरील 'खलिफा' अर्थात नेता किंवा प्रतिनिधी म्हटले जाते. आज रमजान ईदच्या निमित्ताने..!

इतर प्राणिमात्रांप्रमाणे निसर्गाच्या एका ठरावीक चाकोरीबद्ध जीवनात न अडकता मानवाने बुद्धी, विचार आणि विवेकाच्या जोरावर मानवी संस्कृतीचा पाया घातला. ज्ञान, विज्ञान आणि कल्पकतेने विश्वातील सत्यांचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. ही मानवजातीच्या नवोन्मेष व नवनिर्माणाची उर्मी आहे. निसर्गानेही त्याला भरपूर साधन, सुविधा व संसाधने बहाल केली आहेत; पण मानवी जीवनाच्या गरजा भागवण्यासाठी मनुष्याने याचा योग्य व पर्यावरण संतुलित वापर करणे गरजेचे आहे. नैसर्गिक पर्यावरण जपा, जे तुमच्या भावी पिढ्यांचे जीवन आहे. आपण लावलेले एक झाड पुढच्या पिढ्यांना फळे देत राहील, जे एक धर्मादायी काम आहे. ज्यातून एक पर्यावरणपूरक मानवी संस्कृतीचा विकास होईल. इस्लामने अशा मानवी प्रवृत्ती व प्रकृतीचे योग्य संतुलन राखणार्‍या संस्कृतीची भलावण केली आहे. ज्यामध्ये एकच एक विश्वात्मक परमेश्वराचे सत्य, नैसर्गिक न्याय आणि नैतिकतेचा प्राकृतिक 'सत्य जगत धर्म' उजागर केलेला आहे. जो सर्वच मानवजातीसाठी आहे आणि सत्य संकल्प, सत्कर्म, सदाचार व सद्व्यवहाराने अखिल मानवजातीचे कल्याण साधणारा सन्मार्ग आहे. सन्मान, शांती, सुरक्षितता व विकासाचा हा सन्मार्ग एक कठोर कर्तव्य म्हणून आचरणात आणावा.

आज नैसर्गिक पर्यावरण संतुलनासोबतच मानवी जीवनाचे योग्य संतुलन व क्रियाकलाप जरुरीचे आहे. माणसाचा स्वार्थ, हव्यास व ओरबाडण्याची प्रवृत्ती टोकाला गेलेली आहे. कुराण म्हणते, संपत्तीचा हव्यास तुम्हाला गफलतीत चूर करून टाकतो. (कु. 102:1). समाजजीवन अतिशय गढूळ झालेले आहे. दुसर्‍याचे दुःख व वेदना जाणण्याची माणसाची वृत्ती व संवेदना संपुष्टात आलेली आहे. विद्वेष, उन्माद, हुल्लडबाजी, दमन, वर्चस्व, सत्ता, हिंसाचार जो माणसाचा विखार, विकृती व अपप्रवृत्ती आहे, तो वाढीस लागलेला आहे. त्यासाठी तो कोणत्याही थराला जायला मागे पुढे पाहत नाही. संपूर्ण देशात व राज्यात अराजक माजलेले आहे, हे खेदाने म्हणावे लागते. पृथ्वीतलावर दांडगाई व अराजक माजवणार्‍यांची इस्लाम व कुराणने घोर निंदा व धिक्कार केलेला आहे. याबाबत कुराण म्हणते, धरित्रीवर फार ऐटून घमेंडीत चालू नकोस, तू जमीन तर फाडू शकणार नाहीस व पर्वताच्या उंचीस तर पोहोचणार नाहीस. 
 
(कु. 17:37). मुलुखात फिसाद वा अराजक फैलावत फिरू नका. (कु. 26:183). परमेश्वर कोणाही ऐटबाज व शेखीखोरास पसंत करीत नसतो. आपल्या चालण्यात व वागण्यात मध्यमपणा राखा व नम-पणाने हळूहळू बोला. (कु. 31:18-19). जे लोकांवर जुलूम करतात व मुलुखात हकनाक दांडगाई माजवितात, त्यांना परमेश्वर पसंत करीत नसतो. (कु. 42:40-41). जो कोणी चुकीच्या मार्गात आहे, परमेश्वर त्यांना ढीलच ढील दिल्यासारखे करतो आणि जे लोक सन्मार्गावर आहेत. परमेश्वर त्यांना अधिकाधिक सन्मार्गाची बुद्धी देतो. (कु. 19:75-76). ज्या ज्या गोष्टी वाईट आहेत, त्या सर्व परमेश्वर नापसंत करतो. (कु. 17:38). यात तर शंकाच नाही की, जुलमी लोक कोणत्याही प्रकारे सफल व्हायचे नाहीत. (कु. 6:136). एक दिवस त्यांच्या पापाचा घडा नक्की भरेल. 
 
मोहरीच्या दाण्याइतके जरी कर्म असेल अर्थात कोणत्याही परिस्थितीतील कोणतेही कर्म, त्याचा हिशेब नक्की होईल. (कु. 31:16, 21:47). आम्ही सत्य ते असत्याच्या डोक्यावर मारतो आणि असत्याचे मस्तक ठेचून टाकतो. (कु. 21:18). त्यामुळे न्यायाने वागा. न्यायावर द़ृढ राहा. अन्यायाचे प्रवर्तक होऊ नका. अन्यायाचा प्रतिकार करा. निःसंशय न्याय व नीतिमत्ता मोठ्या पायरीची होय. परमेश्वराच्या मार्गात दुर्बल पुरुष, स्त्रिया व मुलांसाठी लढत राहा. कमजोर, पीडितांची पाठराखण करा. द्वेष, उन्माद, हुल्लडबाजी, दमन, वर्चस्व, सत्ता, हिंसाचार म्हणजे धर्म नव्हे. प्रेम, दया, सेवाभाव, बंधुता, सौहार्द, शांती, सहजीवन व मानवता हाच खरा धर्म होय. रमजानचे 'रोजे' तुम्हाला आत्मसंयमनाबरोबरच शारीरिक, मानसिक, नैतिक व अध्यात्मिक बळ देते, जे स्वतःमधील व समाजातील वाईट गोष्टींच्या विरोधात लढण्याचे बळ देते.
 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.