Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

दारूबंदीच्या जिल्ह्यात चक्क शासकीय कार्यालयात दारू पार्टी

दारूबंदीच्या जिल्ह्यात चक्क शासकीय कार्यालयात दारू पार्टी
 

वर्धा : जिल्ह्यात दारूबंदी असली तरी मद्यपींना सर्रास दारू उपलब्ध होत असते. लपून-छपून सर्वत्र दारू विक्री सुरू आहे. आडोसा घेऊन मद्य रिचविले जात आहे. मात्र, आर्ती येथे चक्क एका शासकीय कार्यालयातच संबंधित अधिकारी आपल्या टेबलवर खुलेआमपणे दारू रिचवित असल्याचे छायाचित्र व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयांच्या खिडक्या बाहेर, परिसरात दारूच्या बाटल्या आढळून येणे, ही आता नवीन बाब राहिली नाही. मात्र, आता दारूबंदी जिल्ह्यातच सरकारी कार्यालयात चक्क दारूची पार्टी खुलेआम होत असल्याचे दिसून येत आहे. आर्वी पोलिस ठाण्यापासून जवळपास १०० मीटर अंतरावर एक शासकीय कार्यालय आहे. तेथील एक सहायक प्रशासकीय अधिकारी खुलेआम टेबलावर दारूचा आस्वाद घेताना छायाचित्रात दिसत आहे. त्यामुळे आता पोलिस याप्रकरणी काय कारवाई करणार?, याकडे सर्वाच्या नजरा लागल्या आहेत. अशा प्रकारांवर वेळीच आळा घालण्याची गरज आहे. अन्यथा असे प्रकार जिल्ह्यातच वाढतच जाणार आहे.

कार्यालयातील वरिष्ठांची भूमिका काय
पोलिसांच्या उदासीनतेमुळे आर्वीमध्ये खुलेआम दारूविक्री सुरू असल्याची चर्चा यानिमित्ताने जोरात होत आहे. पोलिस ठाण्यापासून अवघ्या १०० मीटर अंतरावरील शासकीय कार्यालयात दारू पार्टी सुरू असताना पोलिसांना त्याची भणक लागू नये, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गळ्यात सरकारी ओळखपत्र घालून, टेबलवर खुलेआम दारूच्या ढोसासह चकण्याचा आस्वाद घेणारा तो अधिकारी कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या अधिकाऱ्याला राजकीय आकांसह त्यांच्या वरिष्ठांचाही आशीर्वाद असल्याची नागरिकांत चर्चा सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्याला काही दिवसांपूर्वी जिल्हा ठिकाणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दारू पिण्याच्या तक्रारीवरून चांगलेच खडसावले होते, अशी माहिती आहे. मात्र, तालुक्याचे वरिष्ठ त्यांची ढाल बनून असल्याने कारवाई होत नसल्याची ओरड होत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.