पुणे: माणसाला त्याच्या उतारवयात म्हणजेच पन्नाशीनंतर खऱ्या अर्थाने सहकाऱ्याची गरज असते. सध्या मुले-मुली परदेशात शिक्षण घेण्याचे प्रमाणही वाढत असून, घरी-आई वडील एकटेच असल्याचे पाहायला मिळते.
पती किंवा पत्नीच्या निधनानंतर ज्येष्ठ नागरिक हे एकटेच राहत असल्याचे दिसते. ही बाब लक्षात घेत माधव दामले यांनी 'हॅपी सीनियर' ही संस्था सुरू केली आणि तिच्या माध्यमातून ९० ज्येष्ठ नागरिकांचे पुनर्विवाह केले. त्यातील अनेक जण सध्या 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहत आहेत. याबाबत दामले म्हणाले, 'गेल्या १२ वर्षांपासून मी ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करत आहे. १२ वर्षांपूर्वी मी वाई येथे एक आश्रम सुरू केले होते आणि तिथे ज्येष्ठ नागरिकांच्या राहण्याची व्यवस्था केली होती. हे सगळे सरकार नोकरी केलेले लोक होते आणि यांची कोणाशीही जास्त मैत्री नव्हती.'
अशी सुचली कल्पना
'एके दिवशी एका ज्येष्ठ नागरिकाने मुलाशी भांडण झाले म्हणून झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. तेव्हा तेथील महिलांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. मी तेथे पोहोचलो आणि त्यांच्या मुलांनादेखील तेथे बोलावले. त्यांची मुले आम्हाला ओरडू लागली. तेव्हा माझ्या मनात विचार आला की ६५ वर्षांच्या या ज्येष्ठ नागरिकाने पुढे एकटे राहायचे कसे. खऱ्या अर्थाने तेव्हाच या कल्पनेने जन्म घेतला. आम्ही अशा एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना एकत्र आणण्याचे काम सुरू केले,' असे दामले यांनी सांगितले.
कायदेशीर बाबींचा अवलंब
'लिव्ह इन'बाबत दामले सांगतात, 'दुसरे लग्न केले तर समाज काय म्हणेल, याचा ज्येष्ठांच्या मनात विचार येत असतो. त्यामुळे ज्येष्ठांसाठी 'लिव्ह इन'चा पर्याय योग्य ठरू शकतो आणि त्यावर काम करायला सुरुवात केली. २०१२ मध्ये ज्येष्ठ नागरिक 'लिव्ह इन रिलेशनशिप' संस्थेची स्थापना केली. त्यानंतर नियमावलीत ज्येष्ठांची माहिती, वैद्यकीय तपासणी आणि पुरावे मागितले जातात. मग 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहण्यासाठी नियमावली बनविली. महिला आर्थिक सक्षम नसेल तर 'लिव्ह इन'मध्ये राहण्यासाठी काहीतरी अनामत रक्कम ठेवण्याचा नियम केला. 'हॅप्पी सीनियर संस्थेत दर महिन्याला ज्येष्ठांची सहल होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.