कोल्हापूर :- संतापजनक! शवागृहात 'डेडबॉडी'साठी वापरलेल्या बर्फाचा वापर शितपेयांसाठी; लस्सी, मठ्ठा विकणाऱ्यांचा प्रताप
कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाच्या शवागृहातील टाकून दिलेला बर्फ गटारात टाकून पुन्हा धुऊन थंड पाणी, नारळपाणी, लस्सी, मठ्ठा यासाठी वापरण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्यावर
गंभीर परिणाम होऊ शकतो. या घटनेचा व्हिडिओ साम टीव्हीच्या हाती आला असून
त्यात हा संपूर्ण प्रकार स्पष्टपणे दिसून येतो.
गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयाबाहेरील थंडपेय विक्रेत्यांकडे असलेल्या बर्फाबद्दल नागरिकांमध्ये शंका निर्माण झाली होती. काही सतर्क नागरिकांनी या विक्रेत्यांचा मागोवा घेतला असता, धक्कादायक सत्य समोर आले. शवागृहातील बर्फ शव थंड ठेवण्यासाठी वापरला जातो. मृतदेहांखालील हा बर्फ उपयोगानंतर गटारात टाकण्यात येतो. काही विक्रेते हा बर्फ गटारातून काढून स्वच्छ पाण्याने धुऊन त्याचा पुन्हा वापर करत असल्याचे स्पष्ट झाले.
हा बर्फ वापरून नारळपाणी, लस्सी, मठ्ठा आणि इतर थंडपेय विक्री केली जात होती. साम टीव्हीच्या हाती आलेल्या व्हिडिओत काही विक्रेते गटारातील बर्फ उचलून त्याला धुवून पुन्हा पाणी थंड करण्यासाठी वापरत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. हा प्रकार पाहून नागरिक संतप्त झाले आणि त्यांनी एका विक्रेत्याला रंगेहाथ पकडले.या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी थंडपेय विक्रेत्याला जाब विचारला आणि त्याला चोप दिला. काही नागरिकांनी तात्काळ महापालिका व आरोग्य विभागाला याबाबत माहिती दिली. या प्रकारानंतर कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाने घटनास्थळी भेट देऊन चौकशी सुरू केली आहे. प्रशासनाने संबंधित विक्रेत्यांची दुकाने तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. आरोग्य विभाग, प्रशासन आणि पोलिसांनी तपास सुरू केला आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी नागरिकांनीही सतर्क राहणे गरजेचे आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.