Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मालवणजवळ समुद्रात सापडले खनिज तेलसाठे; पालघरच्या सागरी कक्षेतही तेलाचा खनिजा

मालवणजवळ समुद्रात सापडले खनिज तेलसाठे; पालघरच्या सागरी कक्षेतही तेलाचा खनिजा
 

मालवण - येथील खोल समुद्रात सुमारे १९ हजार १३१. ७२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर नवीन खनिज तेलसाठे सापडले आहेत. नव्याने झालेल्या संशोधनात मालवणबरोबरच पालघर जिल्ह्याच्या सागरी कक्षेतही तेलसाठे सापडल्याने तेल उत्पादन क्षेत्रात सक्षम होण्यासाठी नवीन पर्याय मिळाला आहे. संबंधित क्षेत्रात केंद्रीय तेल उत्पादन कंपन्या लवकरच संशोधनाद्वारे उत्खनन करणार असल्याचे उच्चस्तरीय सुत्रांकडून सांगण्यात आले. या सगळ्या संशोधनाबाबत स्थानिक प्रशासन मात्र अनभिज्ञ आहे.

समुद्रातील खनिज तेलसाठ्यांबाबत भारतात दिर्घकाळ संशोधन सुरु आहे. 'मुंबई हाय' हे भारतातील सर्वात मोठे सागरी तेल क्षेत्र मानले जाते. किनाऱ्यापासून सुमारे १६० किलोमीटरवर हे साठे असून तेथे उत्खनन करण्यात येते. मात्र, भारताचे तेलासाठीचे अलंबत्व कमी करण्यासाठी दिर्घकाळ नवे तेल साठे शोधण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. याचाच भाग म्हणून गेली आठ वर्षे अरबी समुद्रात संशोधन सुरु होते. यात आता १८ हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळाहून अधिक क्षेत्रात खनिज तेलाचे नवे साठे समोर आले आहेत. त्या ठिकाणी केंद्रीय तेल उत्पादन कंपन्या लवकरच संशोधनाद्वारे उत्खनन करणार आहेत.

केंद्रीय पेट्रोलियम खात्याने या नव्या तेलसाठ्याच्या संशोधन कार्याला गती दिली आहे. पालघरमधील डहाणूच्या समुद्रात ५३३८ आणि सिंधुदुर्गजवळील मालवण समुद्रात १९ हजार १३१ चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर हे तेलसाठे आहेत. आता सापडलेल्या या तेल साठ्यामुळे भारतातील तेल उत्पादन चार पटीने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या संशोधन व उत्खनन कार्याला गती देण्यासाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. या नवीन साठ्यामुळे अर्थव्यवस्थेला साहाय्य होण्यास मदत होणार आहे. कोकणातील मालवण आणि पालघर या ठिकाणी तेल विहिरींचे उत्खनन सुरू झाल्यास जिल्ह्याची अर्थव्यवस्था बदलून जाणार आहे. रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील. यामुळे महाराष्ट्रातील विकास प्रक्रियेला नवी दिशा मिळणार आहे.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रामध्ये तेलसाठे आढळल्याबाबत अधिकृत माहिती मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होवू शकला नाही. निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांना विचारले असता त्यांनी आपल्याकडे अधिकृत कोणतीही माहिती नाही, असे सांगितले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून याबाबत अधिकृत सविस्तर माहिती उपलब्ध होवू शकली नाही.
उथळ समुद्रात सापडले साठे

अरबी समुद्रातील संशोधनात २०१७ मध्ये तेलसाठे आढळले होते; मात्र याच्या तुलनेत हे नव्याने सापडलेले तेलसाठे मोठे आहेत. केंद्रीय पेट्रोलियम खात्याने या नव्या तेलसाठ्याच्या संशोधन कार्याला गती दिली आहे. या तेल साठ्यामुळे भारत तेल उत्पादनात सक्षम होण्याची शक्यता आहे. भारतात मोठ्या प्रमाणावर तेलाचे उत्पादन वाढण्यास यामुळे मदत मिळणार आहे. उपलब्ध माहितीनुसार हे साठे उथळ समुद्रात आहेत. त्यांचे किनाऱ्यापासूनचे अंतर ८६ सागरी मैल इतके आहे.

'बॉम्बे हाय' नंतर...
अरबी समुद्रात तेलसाठ्यांसाठी अनेक वर्षे संशोधन सुरु आहे. मुंबईपासून ७५ सागरी मैल अंतरावर १९७४ मध्ये 'बॉम्बे हाय' या ठिकाणी खनिज तेलाचा साठा सापडला होता. त्या ठिकाणाहून सध्या तेल उत्खनन होत आहे. आताच्या या नव्या संशोधनामुळे महाराष्ट्रात तेल उत्पादन क्षेत्रात खूप मोठी भर पडेल, अशी आशा व्यक्त होत आहे. मालवणच्या खोल समुद्रात नवीन तेलसाठे सापडले असल्याची माहिती मिळाली आहे; मात्र, संबंधित विभागाकडून आपल्याकडे याबाबत कोणताही अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. याबाबतची अहवाल मिळताच सविस्तर माहिती प्रसार माध्यमांना दिली जाईल.

- वर्षा झालटे, तहसीलदार, मालवण

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.