'सगळी सोंगं करता येतात, पण पैशांचं सोंग करता येत नाही. काहींनी निवडणुकीच्या आधी कर्जमाफी बाबत वक्तव्य केले होते. पण मी सांगतो की 31 तारखेच्या आत कर्जमाफीचे पैसे भरा,' असे आवाहन अर्थमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांना केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय
वर्तुळातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे
प्रमुख राजू शेट्टी यांनी देखील त्यांच्यावर निशाणा साधला आहे. “31
तारखेपर्यंत कर्ज भरा असं शेतकऱ्यांना सांगताना लाज वाटत नाही का?,” असा
सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.
“गाडीचा एसी बंद पडला म्हणून तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना गाड्या
घेण्याची ऑर्डर देता. पण राज्यातील शेतकरी दररोज मरतोय त्याकडे कोण लक्ष
देणार? 2029 सालच्या निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा शेतकऱ्यांना कर्जमाफीचे
गाजर दाखवण्यात येईल,” असा दावा शेट्टी यांनी केला.
पुढे ते म्हणाले की, “महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये घोषणा करत असताना अजित पवार यांना तिजोरीची कल्पना नव्हती का? शेतकऱ्यांच्या मतासाठी पूर्णपणे गंडवलं जातं असून नेत्यांच्या कारखान्यांना थकहमी देत असताना राज्याच्या तिजोरीवर भार पडत नाही का?,” असा देखील सवाल राजू शेट्टी यांनी केला. दरम्यान, राजू शेट्टी यांनी आज कर्जमाफीवरून अजित पवार यांना चांगलेच खडे बोल सुनावले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात राजू शेट्टी विरुद्ध अजित पवार असा संघर्ष निर्माण झाला आहे. यावर आता अजित पवार त्यांना काय प्रत्युत्तर देतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.