Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली कारागृहात गांजा ओढणाऱ्या तिघा कैद्यांवर गुन्हा, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

सांगली कारागृहात गांजा ओढणाऱ्या तिघा कैद्यांवर गुन्हा, सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

सांगली : येथील जिल्हा कारागृहातील बाथरूममध्ये गांजा ओढणाऱ्या सचिन बाबासाहेब चव्हाण (वय ३३, रा. कवठेपिरान), किरण लखन रणदिवे (२७, रा. कारंदवाडी), सम्मेद संजय सावळवाडे (२४, रा. आष्टा) या तिघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

कारागृहातील सुभेदार सूर्यकांत पाटील यांनी 'एनडीपीएस' ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

संशयित सचिन चव्हाण, किरण रणदिवे, सम्मेद सावळवाडे हे तिघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. सध्या ते न्यायालयीन बंदी आहेत. कारागृहात तिघांची ओळख झाली आहे. दि. २९ रोजी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास बॅरेक क्रमांक तीनच्य बाथरूममध्ये तिघेजण औषध गोळ्यांचे रिकामे पाकीट गोल गुंडाळून त्यात गांजा भरून चिलिमसारखे तयार करून गांजा ओढत होते. सुभेदार सूर्यकांत पाटील व हवालदार बबन पवार, शिपाई हणमंत पाटणकर हे बॅरेक क्रमांक ३ मध्ये राऊंड घेत फिरत होते.

तेव्हा बाथरूममध्ये सचिन, किरण, सम्मेद हे तिघेजण गांजा ओढताना दिसून आले. त्यामुळे तिघांना ताब्यात घेतले. तेव्हा सचिन याच्याकडे औषध गोळ्याच्या रिकाम्या पाकिटाला गोल गुंडाळून त्याची चिलिम बनवून गांजा ओढल्याचे दिसून आले. अर्धवट जळालेला गांजा कारागृहातील पोलिसांनी जप्त केला. तत्काळ हा प्रकार वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सुभेदार पाटील यांनी शनिवारी रात्री उशिरा सांगली शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तिघांवर एनडीपीएस ॲक्ट कलम २७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

गांजा आला कोठून

जिल्हा कारागृहात बाहेरून गांजा पुरवण्याचा प्रकार यापूर्वी घडला आहे. रबरी चेंडू, रिकाम्या बाटलीतून गांजा फेकण्याचे प्रकार अधून-मधून घडतात. आता थेट कैद्यांच्या हातात गांजा मिळाल्यानंतर ते गांजा ओढताना आढळल्यामुळे कारागृहाची सुरक्षितता पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.

तिघे रेकॉर्डवरील गुन्हेगार

सचिन चव्हाण याला तीन साथीदारांसमवेत गांजा तस्करीप्रकरणी अटक करून २० लाखाचा गांजा जप्त केला होता. किरण रणदिवे हा बांधकाम व्यवसायिक माणिक पाटील यांच्या खुनातील संशयित आहे. सम्मेद सावळवाडे हा देखील खुनातील संशयित आहे. त्याने दोघांच्या मदतीने तरुणाचे अपहरण करून खून केल्याचा गुन्हा दाखल आहे.

सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह

पुण्यातील गुंड गजा मारणे याला सांगलीतील कारागृहात आणले आहे. त्यामुळे येथील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तरीही सुरक्षा व्यवस्था भेदून थेट गांजा कैद्याच्या हातात पडल्यामुळे सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.