अकोला: शिवप्रतिष्ठान संस्थापक संभाजी भिडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नवीन चर्चेला तोंड फुटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय नव्हते. शिवरायांनी आणि छत्रपती संभाजी
महाराजांनी शहाजी राजे यांचा हिंदवी स्वराज्याचा विचार राबवला. आपल्याकडील
प्राध्यापक, शिक्षक मात्र चुकीचा इतिहास मांडत आहेत, असं मत संभाजी भिडे
यांनी व्यक्त केलं. त्यांच्या वक्तव्यनंतर आता अनेक प्रतिक्रिया समोर येत
आहेत.
अशातच, या वक्तव्यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी संभाजी भिडे यांना चांगलंच सुनावलंय. आता आंब्याचा सिझन आल्यामूळे भिडे बेताल बरळतायेत, असा टोला मिटकरींनी लगावलाय. भिडेंनी बहूजन समाजातील पोरं हाताशी धरून इतिहासाची मोडतोड सुरू केल्याचं ही अमोल मिटकरी म्हणालेय. ते अकोला येथे बोलत होते. शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह्य विधान केलेल्या कोरटकर, सोलापूर आणि विकृत इतिहास लिहाणाऱ्या राम गणेश गडकरींवर भिडे का बोलले नाहीत?, असा सवाल देखील आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय. आता संभाजी भिडेंची व्हॅलीडीटी संपल्याचा टोला यावेळी मिटकरींनी लगावलाय.
....हे जगानं मान्य केलं आहे- अजित पवार
दरम्यान, याच मुद्यांवर भाष्य करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, त्यांना जे वाटतं ते बोलू शकतात, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये सर्व जाती धर्माची लोक होती. छत्रपती शिवाजी महाराज हे एक आदर्श राजा होते आणि रयतेचे राजा होते. राजा कसा असावा हे जगानं मान्य केलं आहे,असे अजित पवारांनी म्हटलं आहे. ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.
संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले?
छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय नव्हते. शिवरायांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी शहाजी राजे यांचा हिंदवी स्वराज्याचा विचार राबवला. आपल्याकडील प्राध्यापक, शिक्षक मात्र चुकीचा इतिहास मांडत आहेत, असं मत शिवप्रतिष्ठान संस्थापक संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. छत्रपती शहाजी राजे हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावे, या मताचे होते. मात्र त्यांना यश आले नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी तो विचार पुढे आणला. राजकीय पक्ष, गट, संघटना मात्र स्वार्थासाठी शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून घेत आहेत, असं संभाजी भिडे यांनी केलं आहे. ते बुधवारी सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.