Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी सोमय्यांकडून दबाव; उपविभागीय अधिकाऱ्यांचा गंभीर आरोप

खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी सोमय्यांकडून दबाव; उपविभागीय अधिकाऱ्यांचा गंभीर आरोप
 

सिल्लोड : भाजपाचे माजी खा. किरीट सोमय्या यांनी ज्या ४०६ जणांना बांगलादेशी संबोधून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे, त्यातील एकही बांगलादेशी नाही. बनावट कागदपत्रे देणाऱ्या तिघांवर आम्ही गुन्हा दाखल केला आहे. एकही बांगलादेशी नागरिकाला आम्ही जन्म प्रमाणपत्र दिले नाही, तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. असे असताना आपल्यावर उर्वरित ४०३ लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे, असा आरोप उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी गुरुवारी माजी खा. किरीट सोमय्या यांच्यावर केला.

सिल्लोड तालुक्यात बनावट जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी पोलिसांनी शहरातील तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. भाजपाचे माजी खा. किरीट सोमय्या यांनी मात्र सिल्लोड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातून बांगलादेशातील ४०६ जणांना बनावट जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप केला आहे. या अनुषंगाने त्यांनी तिसऱ्यांदा गुरुवारी दुपारी १ वाजता सिल्लोडला येथे येऊन पोलिस ठाण्यास भेट दिली. यावेळी ते म्हणाले, सिल्लोड तालुक्यात ज्या बांगलादेशी लोकांना जन्म प्रमाणपत्र देण्यात आले ते ठरवून झालेले षड्यंत्र आहे. त्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संगनमत करून ४० ते ५० वर्षांपूर्वी जन्मलेल्या तालुक्यातील ४०६ लोकांना केवळ आधार कार्डच्या आधारे जन्म प्रमाणपत्र दिले आहे. यात फक्त तिघांवर गुन्हा दाखल झाला असून, उर्वरित ४०३ जणांवर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना सहआरोपी करा, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिनेश कोल्हे, पोलिस निरीक्षक शेषराव उदार यांच्यासह भाजपचे सुरेश बनकर, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, तालुकाध्यक्ष अशोक गरुड, कारखान्याचे चेअरमन ज्ञानेश्वर मोठे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील मिरकर, शहराध्यक्ष कमलेश कटारिया, मनोज मोरेल्लू आदी उपस्थित होते.

दोषी आढळल्यास कठोर कारवाई करू
 
यापूर्वी खोटी कागदपत्रे सादर करून जन्म प्रमाणपत्र मिळवणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केला आहे. त्या गुन्ह्यात सोमय्या यांच्या तक्रारीचा समावेश करण्यात आला आहे. आता वरील लोकांची कागदपत्रे तपासून संबंधित अधिकाऱ्यांचा अहवाल आल्यावर चौकशीत कुणी दोषी आढळले, तर त्यांच्याविरुद्ध कठोर कार्यवाही करण्यात येईल.
 
-शेषराव उदार, पोलिस निरीक्षक, सिल्लोड शहर

खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी आपल्यावर दबाव
ज्या ४०६ लोकांविरुद्ध सोमय्या यांनी तक्रार केली होती, त्यांची तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व नेमलेल्या पथकमार्फत चौकशी करण्यात आली आहे. ते नागरिक स्थानिक रहिवासी असल्याचे पुरावे आढळले आहेत. आम्ही एकही बांगलादेशीला जन्म प्रमाणपत्र दिले नाही. तसा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दोन दिवसांपूर्वी दिला आहे. कुणी बांगलादेशी आढळलाच नाही, तर आम्ही खोटे गुन्हे कसे दाखल करणार? ४०३ लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात येत आहे. तसे केले नाही म्हणून माझ्यावर खोटे आरोप होत आहे.
 
- लतीफ पठाण, उपविभागीय दंडाधिकारी, सिल्लोड


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.