पंतप्रधान नरेंद्र मोदी दीक्षाभूमीवर नतमस्तक; विजिट बुकमध्ये काय लिहिला संदेश?
नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दीक्षाभूमीला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी मध्यवर्ती स्तुपातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला तसेच तथागत गौतम बुद्धांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रविवारी नागपुरात होते. सकाळी ९.३० वाजता त्यांनी दीक्षाभूमीला भेट दिली. यावेळी दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पंतप्रधानांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, स्मारक समितीचे सचिव डॉ. राजेंद्र गवई, सदस्य विलास गजघाटे, एन.आर. सुटे, एड. आनंद फुलझेले प्रामुख्याने उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी मध्यवर्ती स्तुपातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला पुष्प अर्पण करून अभिवादन केे. त्यानंतर तथागत गौतम बुद्धाच्या मूर्तीला पुष्प अर्पण करून अभिवादन केले. बुद्ध वंदनाही ग्रहण केली. पंतप्रधान १५ मिनिटे दीक्षाभूमीवर होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनुसार देशाला विकासाकडे नेणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजिट बुकमध्ये आपला संदेश लिहिला. त्यात त्यांनी लिहिले की, दीक्षाभूमी आम्हाला गरीब, वंचित आणि गरजूंना समान अधिकार आणि न्यायाच्या व्यवस्थेसाठी पुढे जाण्याची ऊर्जा प्रदान करते.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि मूल्यांवर चालत देशाला विकासाच्या नवीन शिखरावर घेऊन जाऊ. एक विकसित आणि समावेशी भारताचे निर्माण हीच खरी बाबासाहेबांना आदरांजली ठरेल.
स्मारक समितीतर्फे पंतप्रधानांना गोल्डन कलर असलेली दीक्षाभूमीची प्रतिकृती भेट
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीतर्फे पंतप्रधानांचे स्वागत करण्यात आले. शाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि गोल्डन कलरमध्ये दीक्षाभूमीची प्रतिकृती असलेले स्मृतिचिन्ह पंतप्रधान मोदी यांना भेट देण्यात आले
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.