मुंबई: राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी गेल्या काही महिन्यांपासून मुस्लिम समाजाबद्दल सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करून वातावरण तापवलं आहे. अलीकडेच त्यांनी बुरख्यावरून पुन्हा एकदा विधान केलं, ज्यामुळे राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान चांगलेच संतापले आहेत. प्यारे खान यांनी या प्रकरणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार
करण्याचा निर्णय घेतला आहे. नितेश राणेंचं बेजबाबदार वक्तव्य चुकीचं असून,
त्यांनी मुस्लिम समाजाबद्दलचा दृष्टिकोन बदलावा, असं खान यांनी ठणकावलं.
त्यांच्या या वक्तव्यांमुळे महाराष्ट्र सरकारची प्रतिमा डागाळत असल्याची टीकाही त्यांनी केली. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास” या तत्त्वावर काम करत असताना मंत्र्यांनी अशी विधानं करून सरकारला अडचणीत आणू नये, असं प्यारे खान म्हणाले. हलाल मटण, मल्हार मटण सर्टिफिकेट आणि औरंगजेबाच्या मुद्द्यावरूनही राणेंच्या वक्तव्यांनी वाद निर्माण झाला आहे.
प्यारे खान यांचा इशारा: पंतप्रधानांकडे तक्रार –
प्यारे खान यांनी सांगितलं की, नितेश राणेंच्या दोन समाजांत तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांविरोधात पंतप्रधानांकडे तक्रार केली जाणार आहे. विशेषत: नागपूरसह महाराष्ट्रातून राणेंच्या मुस्लिम समाजाविरोधी वक्तव्यांबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. अल्पसंख्याक आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, कारवाईची मागणी केली आहे. खान म्हणाले, “भारतात ‘सबका विकास’चा नारा दिला जातो, पण अशा वक्तव्यांमुळे धार्मिक तणाव वाढतो. अल्पसंख्याक मंत्री म्हणून मी हे प्रकरण पंतप्रधानांपर्यंत नेईन.”
अमरावतीतही गुन्हा दाखल –
नितेश राणेंच्या वक्तव्यांचा वाद अमरावतीपर्यंत पोहोचला आहे. भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर अचलपूरमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी हिंदू जन आक्रोश सभेत त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे हा गुन्हा नोंदवण्यात आला. धार्मिक भावना दुखावल्याचा ठपका ठेवत कलम 196 आणि 3(5) अंतर्गत कारवाई झाली. इमरान खान असलम खान यांनी अचलपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, ज्यात नितेश राणे आणि सागर भैय्या बेग यांच्यावर आरोप ठेवले गेले. या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवला आहे. नितेश राणेंच्या सततच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आता अल्पसंख्याक आयोगाने कठोर पावलं उचलण्याची तयारी दर्शवली आहे. या प्रकरणाची पुढील कारवाई काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.