अवैधरीत्या सावकारी प्रकरणात न्यू नंदनवन कॉलनीतील सावकार चारुशीला इंगळे हिचे घर, दुकानात बुधवारी (ता. २६) छापा टाकून घबाड हाती लागल्यावर सहकार विभागाचे अधिकारीही चक्रावून गेले.
५० हून अधिक कर्जदारांच्या बॅंक पासबुकांसह प्लॉटचे खरेदीखत करून घेतल्याचे समोर आले. यात आता नवनवीन माहिती समोर येत आहे. चारुशीलाची मुलगी प्रिया हिचाही यात सहभाग असल्याचे उघड झाले आहे. प्रियाने आजवर कर्जदारांना तसेच झडतीदरम्यान सहकार अधिकाऱ्यांनाही 'माझे सासरे जज आहेत, पती हायकोर्टात वकील आहेत, बघून घेईन' अशा धमक्या दिल्याचे पथकप्रमुख सुरेखा फुपाटे यांनी सांगितले.
चारुशीलाचे पती प्रभाकर २०११ मध्ये तलाठी पदावरून निवृत्त झाले आहेत. मुलगी पदवीधर (एमएसडब्ल्यू) असून, विवाहानंतर मुंबईत राहते. दोनपैकी एक मुलगा कंपनीत काम करतो, तो अंतर्गत कलहामुळे स्वतंत्र राहतो. घरातील कपाटाची चावी मुलाकडे असल्याने त्यानेही कपाट उघडण्यास नकार दिला होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
पंचनाम्यावर सहीलाही नकार
सहकारच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून पंचनामा केला. त्यावर सही करण्यास चारुशीला तसेच प्रियाने नकार दिला. अखेर अधिकाऱ्यांनी सावकारीसंदर्भात घबाड सापडलेल्या तिच्या दुकानाला पंचनाम्याची प्रत चिकटवली.
दंडापोटी आगाऊ वसुली
चारुशीला सावकारकीसोबतच अवैधरीत्या भिशी चालवत असल्याचे समोर आले आहे. यासाठी केलेले स्वतंत्र रजिस्टर अधिकाऱ्यांच्या हाती लागले आहे. दुकानात कपड्यांसह इतर साहित्य उधारीवर घेतलेल्यांकडूनही चारुशीलाने दंडापोटी आगाऊ रक्कम वसूल केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कासव घरातच लहानाचे मोठे
घरी २०११ मध्ये कासव आणल्याची माहिती चारुशीलाने अधिकाऱ्यांना दिली. हे कासव घरातच लहानाचे मोठे झाले.
पोलिसांनी वेळीच दखल घेतली असती तर...
यासंदर्भात तक्रारदार विजय गणराज यांनी सांगितले, की २०१५ मध्ये आम्ही पोलिसांत तक्रार केली होती, परंतु तेव्हा कारवाई झाली नाही. उलट चारुशीलाने आमच्याकडून साक्षऱ्या करून घेतलेल्या कोऱ्या धनादेशावर आकडा टाकून ते बॅंकेत भरले. त्याचवेळी पुरेशा रकमेअभावी ते न वटल्याने तिने आमच्यावरच १३८ नुसार गुन्हे दाखल केले. या प्रकरणाची पोलसांनी त्याचवेळी दखल घेतली असती, तर ही वेळ आलीच नसती, अशी खंत तक्रारदारांनी 'सकाळ'शी बोलून दाखविली.
'सहकार'ला पोलिसांचे असहकार्य
सावकारीचे ठोस पुरावे मिळाल्याने छाप्याच्या दुसऱ्या दिवशी, गुरुवारी (ता. २७) तालुका सहनिबंधक फुपाटे यांनी कर्मचारी सुभाष राठोड यांच्यामार्फत गुन्हा दाखल करण्यासंदर्भात छावणी पोलिसांना एक पत्र दिले. त्यांच्यासोबत दहा ते बारा कर्जदारही पोलिस ठाण्यात गेले, परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नसल्याचे तक्रारदारांनी सांगितले. तलाठी पदावरून निवृत्त झालेल्या व्यक्तीच्या बॅंक खात्यावर पेन्शनची ठरावीक रक्कम जमा होते. परंतु, एकाच वेळी तीन-चार लाखांच्या रकमा खात्यावर जमा झाल्याचे समोर आले आहेत. यात अजूनही चौकशी, तपास करत आहोत.- सुरेखा फुपाटे, तालुका सहनिबंधक तथा पथकप्रमुखगुन्हा दाखल करण्यासंदर्भातील सहकार विभागाकडून पत्र प्राप्त झाले. पोलिस आयुक्तालयात बैठकीसाठी गेलो होतो. शुक्रवारी (ता. २८) सकाळी गुन्हा दाखल करून घेण्यात येईल.- दिलीप ठाकूर, पोलिस निरीक्षक, छावणी पोलिस ठाणे
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.