हातावर मेहंदी, साखरपुड्यासाठी पाहुणे जमले, पण नवरदेवाच्या अंत्ययात्रेला जाण्याची वेळ; अख्खं गाव रडलं
नांदेड : नातेवाईकातल्या मुलीसोबत प्रेम जडलं, त्यांच्या प्रेम विवाहाला दोन्ही कुटुंबाची सहमती मिळाली. साखरपुडा होणार असल्यानं नवरदेव आनंदी होता. आपल्या हातावर मेहंदी देखील लावली होती. मात्र साखरपुडा कार्यक्रमाच्या आधीच
नवरदेवावर काळाने घाला घातला. हिटरच्या पाण्याची टाकी अंगावर पडल्याने ६५
टक्के भाजलेल्या नवरदेवाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यातील
अर्धापूर तालुक्यात ही दुर्दैवी घटना घडली. बोहल्यावर चढण्यापूर्वी
नवरदेवाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. महेशसिंह ठाकूर असं
मयत तरुणाचे नाव आहे.
मयत महेश ठाकूर हा अर्धापूर तालुक्यातील
मेंढला (बु) येथील रहिवासी आहे. हैदराबाद येथे तो काम करत होता.
नातेवाईकातील मुलीसोबत त्याचे सूत जुळले. दोघांनी विवाह करायचं ठरवलं.
दोघेजण नात्यातील असल्याने दोघांच्या कुटुंबियांनी विवाहाला सहमती दर्शवली.
त्यानंतर त्यांचा साखरपुडा होणार होता. पण नियतीला काही औरच मान्य होतं.
महेश हाताला मेहंदी लावून टेरेसवर झोपला होता. बाजूला असलेली हिटरची गरम पाण्याची टाकी अचानक त्यांच्या अंगावर पलटली. त्यात तो ६५ टक्के भाजला, कुटुंबियांनी तात्काळ महेशसिंहला रुग्णालयात दाखल केले. तब्बल नऊ दिवस त्याने मृत्यूशी झुंज दिली, त्याला वाचण्यासाठी डॉक्टरांचे शर्तीचे प्रयत्न सुरु होते. पण अखेर घटनेच्या नवव्या दिवशी त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या पश्चात आई वडील, बहीण भाऊ असा परिवार आहे.साखरपुड्यासाठी आलेले पाहुणेही घरातच होते. साखरपुड्यास जाणाऱ्या नातेवाईकांना नवरदेवावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ नियतीने आणली. संसाराच्या वेलावर पदार्पण करण्याआधीच नवरदेवाची अंत्ययात्रा निघाली अन संसार थाटण्याचं स्वप्न आणि प्रेमाची ती कहाणी अधुरीच राहिली. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेने दोन्ही कुटुंब शोकसागरात बुडाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.