राहुल गांधींनी प्रियंका गांधींबरोबर केलेल्या 'त्या' कृतीने संतापले ओम बिर्ला; BJP ने शेअर केला व्हिडिओ
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बुधवारी विरोधी पक्षनेते राहुल गांधींना एका वेगळ्याच कारणामुळे इशारा दिल्याचं पाहायला मिळालं. सभागृहाचे नियम आणि मर्यादा बाळगण्यात राहुल गांधी कमी पडत असल्याचं सूचित करत त्यांनी सभागृहाचे नियम व मर्यादेचं भान ठेवलं पाहिजे असं ओम बिर्लांनी सांगितलं.
राहुल गांधींना असा इशारा देण्यामागील कारण ठरलं त्यांनी त्यांची बहीण आणि वाय्यनाडच्या खासदार प्रियंका गांधींबरोबर सभागृहामध्ये केलेली एक कृती. राहुल गांधींच्या या कृतीवरुन नवीन वादाला तोंड फुटलं असून ओम बिर्लांनी इशारा दिल्यानंतर भारतीय जनता पार्टीने राहुल गांधींनी नेमकं काय केलं याचा व्हिडीओ शेअर केला आहे.
भाजपाने शेअर केला व्हिडीओ
ओम बिर्लांनी राहुल गांधींना इशारा दिल्यानंतर, भाजपाचे नेते आणि भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालविय यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन संसदेमधील एक व्हिडीओ क्लिप शेअर केली. या व्हिडीओ क्लिपमध्ये राहुल गांधी संसदेमध्ये कामकाज सुरु असताना सभागृहात दाखल झाल्यानंतर त्यांची बहीण प्रियंका गांधींच्या सीटजवळ गेले. त्यांनी लाडात बहिणीच्या गालांना हात लावला आणि दोघे बोलू लागले. मात्र भावा-बहिणीच्या भेटीदरम्यान राहुल गांधींनी आपल्या बहिणीचे म्हणजेच एका खासदाराच्या गालांना अशाप्रकारे सभागृहात स्पर्श केल्याच्या मुद्द्यावरुन आक्षेप घेण्यात आला.
अशा बालीश व्यक्तीला काँग्रेसने
अमित मालविय यांनी सभागृहातील व्हिडीओ शेअर करत राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका केली आहे. "हे फार लज्जास्पद आहे ही लोकसभा अध्यक्षांना विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना सभागृहातील नियम समजावून सांगावे लागले. काँग्रेसने या बालीश व्यक्तीला आपल्यावर लादलं आहे हे फार दुर्देवी आहे," अशी कॅप्शन अमिल मालविय यांनी दिली आहे.
मला बोलू दिलं नाही- राहुल गांधी
अमित मालविय यांनी शेअर केलेली ही व्हिडीओ क्लिप 18 मार्चची आहे. दरम्यान राहुल गांधींनी संसदेबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना, ओम बिर्लांनी माझ्यासंदर्भात काही आक्षेप घेतला असं दिसून आल्याचं म्हटलं आहे. "अध्यक्ष निघून गेले. त्यांनी मला बोलूच दिलं नाही. ते मला काहीतरी म्हणाले आणि निघून गेले. त्यांनी सभागृह तहकूब केलं. खरं तर याची गरज नव्हती. मी जेव्हा बोलायला उभा राहतो मला अडवलं जातं. मी शांतपणे बसलो होतो. या प्रकराला लोकशाही म्हणता येणार नाही. मला महाकुंभवर बोलायचं होतं. मला बेरोजगारीवर बोलायचं होतं. मला बोलायची संधी द्यायला हवी होती," असं राहुल गांधी म्हणाले.
अगदी शाळेत गेल्यासारखं वाटलं
दरम्यान, काँग्रेसचे खासदार किर्ती चिदम्बरम यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना नेमकं काय घडलं आणि सभागृह का स्थगित करण्यात आलं काही कळलं नाही असं म्हटलं आहे. "नेमका काय गोंधळ झाला किंवा अध्यक्षांनी असा इशारा का दिला हे समजलं नाही. मला हे पाहून शाळेतील मुख्याध्यापक आठवले. शाळेत गेल्यासारखं वाटलं अगदी. सभागृह तहकूब का झालं मला कळलं नाही," असं किर्ती यांनी म्हटलं.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.