Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पुणे:- कार्यकारी अभियंत्यासह तिघांना एकाच वेळी लाच घेताना पकडले; कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयातील बॅगेत सापडले 8 लाख 58 हजार 400 रुपये

पुणे:- कार्यकारी अभियंत्यासह तिघांना एकाच वेळी लाच घेताना पकडले; कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयातील बॅगेत सापडले 8 लाख 58 हजार 400 रुपये
 

पुणे :-केलेल्या कामाची पाहणी करणार्‍या समितीला देण्यासाठी, बिलाची फाईल मंजूर करुन वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी आणि फाईल मंजूर करुन बिल काढण्यासाठी अशा प्रकारे एकाच कामासाठी एकाच कार्यालयात तब्बल तीन ठिकाणी ते ही प्रत्येकी २ टक्के लाच द्यावी लागत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एकाच वेळी एकाच कार्यालयातील तीन वेगवेगळ्या अधिकार्‍यांना एकाच कामासाठी लाच देताना पकडण्यात आले असून ही पहिलीच वेळ आहे.  कार्यकारी अभियंता बाबुराव कृष्णा पवार  (वय ५७), उपअभियंता दत्तात्रेय भगवानराव पठारे (वय ५५) आणि कनिष्ठ अभियंता अंजली प्रमोद बगाडे  अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे तिघेही जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात कार्यरत आहेत.

 
तक्रारदार हे शासकीय ठेकेदार असून त्यांच्या फर्मच्या नावाने शासकीय टेंडर घेत असतात. कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग यांनी दौंड तालुक्यातील खुटबाव रोड ते गलांडवाडी पांदन शिव रस्ता व गलांडवाडी मंदिर ते ज्ञानदेव कदम घर रस्ता या कामाचे टेंडर सप्टेंबर २०२४ मध्ये प्रसिद्ध केले होते. तक्रारदार यांनी या दोन कामाची वर्कऑर्डर मिळाली होती. या कामाच्या रक्कमेमध्ये जीएसटी व इतर कर अशी दोन्ही कामाची बिलाची रक्कम ४० लाख रुपये होत आहे. ही कामे केल्यानंतर तक्रारदार यांनी ३ मार्च २०२५ रोजी कनिष्ठ अभियंता अंजली बगाडे यांनी तक्रारदार यांनी केलेल्या कामाच्या ठिकाणी जाऊन पुणे जिल्हा परिषदेकडील एस क्यु एम कमिटी केलेल्या कामाची पाहणी करुन अहवाल देईल.
त्यासाठी या कमिटीकरीता प्रत्येक कामापोटी ७ हजार रुपये असे दोन कामाकरिता १४ हजार रुपयांची लाच मागितली. तसेच तक्रारदाराच्या दोन कामाच्या बिलाची फाईल तयार करुन मंजुरीसाठी ऑनलाईन सादर करण्यासाठी कामाच्या बिलाच्या रक्कमेच्या २ टक्के प्रमाणे ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार हे दत्तात्रेय पठारे यांना भेटले असता त्यांनी तक्रारदाराकडे दोन कामाच्या बिलाची फाईल तपासून ती फाईन वरिष्ठ अधिकारी कार्यकारी अभियंता बाबुराव पवार याच्याकडे पाठविण्यासाठी कामाच्या बिलाच्या रक्कमेच्या २ टक्के प्रमाणे म्हणजे ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार हे बाबुराव पवार यांना भेटले असता त्यांनी सुद्धा तक्रारदाराकडे दोन कामाच्या बिलाची फाईल मंजूर करण्याकरीता व बिल देण्याकरीता कामाच्या बिलाच्या रक्क्मेच्या २ टक्के प्रमाणे ८० हजार रुपये लाच मागितली. त्याची तक्रारदार याने १० मार्च रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.
या तक्रारीच्या अनुषंगाने ११ मार्च रोजी या तिघांकडे पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली. त्यात अंजली बगाडे यांनी १४ हजार रुपये तसेच दत्तात्रेय पठारे यांनी बिलाची फाईल तपासणी करुन वरिष्ठांकडे मंजुरीसाठी पाठविण्याकरीता तडजोडीअंती ६४ हजार रुपये लाचेची मागणी केली. बाबुराव पवार यानेही तडजोडीअंती ६४ हजार रुपयांची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या कार्यालयात सापळा रचण्यात आला.

बाबुराव पवार यांनी तक्रारदाराकडून त्यांच्या कामाच्या बिलाची फाईल मंजूर करुन बिल काढण्यासाठी ६४ हजार रुपये स्वीकारले. त्यानंतर अंजली बगाडे यांनी आपल्याला देण्यात येणारे १४ हजार रुपये दत्तात्रेय पठारे याच्याकडे देण्यास सांगितले. तक्रारदाराकडून स्वत: मागणी केलेले ६४ हजार रुपये आणि अंजली बगाडे हिने मागणी केलेले १४ हजार रुपये असे ७८ हजार रुपये स्वीकारताना त्या दोघांना पकडण्यात आले. बाबुराव पवार याच्या कार्यालयातील एका बॅगेत ८ लाख ५८ हजार ४०० रुपयांची रोख रक्कम मिळाली असून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ती जप्त केली आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक रुपेश जाधव हे तपास करीत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.