सांगली : सांगलीवाडी येथे धुळवडीनिमित्त भांगेच्या गोळ्यांची विक्री करणारा दीपक राधेश्याम केवट (वय २६, रा. कॉलेजच्या पाठीमागे, सांगलीवाडी, मूळ रा. कुन्नुकाडेल, जि. फत्तेपूर सिक्री, उत्तर प्रदेश) याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने पकडले . त्याच्याकडून २ लाख २७ हजार २८० रुपयांच्या ११ किलो ३१४ ग्रॅम भांगेच्या गोळ्या जप्त केल्या.
स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक सांगली शहर परिसरात गस्त घालत होते. सहायक निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकातील कर्मचारी सोमनाथ पतंगे यांना सांगलीवाडीत भंगार दुकानाजवळ दीपक केवट हा धुळवडीनिमित्त भांगेच्या गोळ्या विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सांगलीवाडीत जाऊन पाहणी केली. तेव्हा भंगार दुकानाजवळ संशयित तरुण भांगेच्या गोळ्या विक्री करीत असल्याचे दिसून आले. पथकाने त्याला ताब्यात घेतले. दुकानाची झडती घेताना बॅरेलमध्ये भांगेच्या गोळ्या मिळून आल्या. गोळ्या कुठून आणल्या याची चौकशी केल्यानंतर त्याने कुन्नुकाडेला या उत्तर प्रदेशातील गावातून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. एकूण ११ किलो ३१४ ग्रॅम भांगेच्या गोळ्या जप्त केल्या. २ लाख २६ हजार ७८० रुपयांच्या गोळ्या व रोख पाचशे रुपये असा २ लाख २७ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.पोलिस कर्मचारी सोमनाथ पतंगे यांनी शहर पोलिस ठाण्यात केवट याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. केवट याला मुद्देमालासह शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सावंत, कर्मचारी इम्रान मुल्ला, अमोल ऐदाळे, संकेत मगदूम, अतुल माने, आमसिद्ध खोत, बाबासाहेब माने, अनंत कुडाळकर, रोहन घस्ते यांच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.