'महिलेच्या गालाला, शरिराला हात लावणं म्हणजे.'; न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय
एका ६५ वर्षीय व्यक्तीला महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षा झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील गिरगाव दंडाधिकारी न्यायालयाने या प्रकरणी निकाल देत, आरोपीला एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा तसेच एक हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही घटना २० डिसेंबर, २०२३ रोजी घडली. सदर प्रकरणात, पीडित महिला आणि आरोपी एकाच इमारतीत राहणारे आहेत. फिर्यादीनुसार, महिला लिफ्टमधून आपल्या घरी जात असताना, आरोपीने लिफ्टमध्ये प्रवेश केला. त्याने महिलेस पत्ता विचारला आणि नंतर जबरदस्तीने तिचा हात पकडून गालाला स्पर्श केला. महिलेने तात्काळ या घटनेची तक्रार पोलिसांकडे दाखल केली.
सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर युक्तिवाद केला, की आरोपीने महिलेला लिफ्टमधून उतरताना धमकावले. 'तू माझ्या घरी ये, नाहीतर मी तुझ्या घरी येईन,' असे त्याने म्हटल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे महिला भयभीत झाली होती. आरोपीने महिलेच्या गालाला स्पर्श केल्याचे दृश्य सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाले होते, आणि हे फुटेज पुरावा म्हणून सादर करण्यात आले.
आरोपीच्या वकिलांनी, पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यांवर आक्षेप घेतला. पेन ड्राईव्ह सादर करताना आयटी (IT) कायद्यांतर्गत आवश्यक प्रमाणपत्र सादर केले नसल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. तथापि, न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला. न्यायालयाने स्पष्ट केले की, तांत्रिक बाबींपेक्षा तक्रारदार महिलेने दिलेला जबाब अधिक महत्त्वाचा आहे. दंडाधिकारी श. उ. देशमुख यांनी निरीक्षण नोंदवताना सांगितले, की आरोपीने तक्रारदाराची लैंगिक छळवणूक केली, हे सिद्ध होते. महिलेने आपल्या जबाबात, आरोपीने गालाला आणि शरीराला स्पर्श करून विनयभंग केल्याचे नमूद केले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.