शारीरिक संबंध ठेवले, नंतर लग्नास नकार... अल्पवयीन मुलीने जीवन संपवल्याप्रकरणी शिंदे शिवसेनेच्या नेत्याला 10 वर्षांची शिक्षा
एका अल्पवयीन मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एम. कदम यांनी आरोपीस दहा वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी ता. ३ सप्टेंबर २०२० रोजी वाढवणा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी विकास उर्फ कल्याण गोविंदराव जाधव याने फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिच्या घरी जाऊन आरोपीने मी तुझ्याशी लग्न करणार नाही, आता माझा नाद सोड, नाहीतर तुला व तुझ्या भावाला आणि तुझ्या वडिलांना खतम करतो अशी धमकी दिली होती. तसेच मुलीच्या वडिलांस शेतामध्ये जाऊन तू व तुझ्या पोरीने माझी गावामध्ये बदनामी केली असे म्हणून शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. यामुळे पीडित मुलगी हिने ता. २ सप्टेंबर २०२० रोजी रात्री घरातील सर्वजण जेवण करून झोपल्यानंतर विष प्राशन करून आत्महत्या केली होती. याप्रकरणी वाढवणा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक संदीप जोंधळे यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.
सुनावणीदरम्यान सरकार पक्षाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या साक्षीपुराव्यांवर व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून विशेष जिल्हा न्यायाधीश आर. एम. कदम यांनी आरोपीस दहा १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील म्हणून अॅड. एस. आय. बिराजदार यांनी काम पाहिले. त्यांना अॅड. बी. एन. भालके व कोर्ट पैरवी अधिकारी सहायक पोलिस उपनिरीक्षक आर. पी. शेख यांनी सहकार्य केले. तर जिल्हा सरकारी वकील अॅड. एस. व्ही. देशपांडे यांनी मार्गदर्शन केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.