Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीसाठी चीनसह अनेक राष्ट्रप्रमुखांना निमंत्रण, PM मोदींना नाही; कारण...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीसाठी चीनसह अनेक राष्ट्रप्रमुखांना निमंत्रण, PM मोदींना नाही; कारण...
 
 
डोनाल्ड ट्रम्प येत्या 20 जानेवारीला अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे नेतृत्व करणार आहेत. वॉशिंग्टन डीसी येथे हा शपथविधी सोहळा होणार असून, त्यात जागतिक नेतेही सहभागी होणार आहेत. चीन, अर्जेंटिना, इटली, अल साल्वाडोर आणि हंगेरीसह अनेक देशांच्या नेत्यांना निमंत्रण पाठवल्याची माहिती आहे. मात्र, या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

नरेंद्र मोदींना निमंत्रण नाही?
गेल्यावर्षी झालेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांचा पराभव करत दुसऱ्यांदा अमेरिकेची सत्ता काबीज केली. निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला उपस्थित राहण्यासाठी न्यूयॉर्कला गेले होते. त्यावेळी ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. मोदींसोबतची भेट आपली निवडणूक प्रतिमा मजबूत करेल, असा ट्रम्प यांचा विश्वास होता. अर्जेंटिनाचे अध्यक्ष झेवियर मिले, हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन आणि इटालियन पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यासारखे जागतिक नेते ट्रम्प यांना पाठिंबा देत होते किंवा त्यांची भेट घेत होते. मोदींसोबतच्या भेटीमुळे ट्रम्प समर्थक आणि सर्वसामान्य अमेरिकन जनतेला मोठा संदेश गेला असता. पण, ट्रम्प यांनी मोदींना भेटण्याची इच्छा व्यक्त केल्यावर भारतासमोर मोठा पेच निर्माण झाला होता.

भारत-अमेरिका संबंधांवर परिणाम
 
2019 मध्ये झालेला 'हाऊडी मोदी' कार्यक्रम मोठी राजकीय चूक मानली गेली. शिवाय, मोदींनी ट्रम्प यांची भेट घेतली असती आणि कमला हॅरिस निवडणूक जिंकल्या असत्या, तर त्याचा भारत-अमेरिका संबंधांवर नकारात्मक परिणाम झाला असता, त्यामुळेच मोदी आणि ट्रम्प यांची भेट झाली नाही.

ट्रम्प यांची नाराजी 
मोदींनी भेट नाकारल्यामुळे ट्रम्प नाराज झाल्याचीही चर्चा त्यावेळी होती. आता ट्रम्प यांनी निवडणूक जिंकली असून, ते 20 जानेवारीला अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. ट्रम्प यांनी शपथविधीसाठी वैचारिकदृष्ट्या जवळचे किंवा निवडणुकीत उघडपणे पाठिंबा देणाऱ्या बहुतांश नेत्यांना निमंत्रण पाठवले आहे. 
भारताची संतुलित भूमिका

दरम्यान, भारत सरकारच्या उच्च सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला भारतातून कोणीही जाणार नाही. डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन, या दोन्ही पक्षांशी समान संबंध राखणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. भारताने नेहमीच हे अमेरिकेसोबतचे संबंध कोणत्याही एका राजकीय पक्षापुरते मर्यादित ठेवले नाहीत. ट्रम्प आणि मोदी यांच्यातील संबंध चांगले असतील, पण भारताने राजनैतिक संतुलन राखण्याचा निर्णय घेतला.

पुढे काय होणार?
पंतप्रधान मोदी शपथविधी सोहळ्याला उपस्थित न राहिल्याने त्याचा दीर्घकालीन परिणाम होणार नाही. ट्रम्प असो वा अन्य कोणी, भारत-अमेरिका संबंध मजबूत राहतील.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.