मुंबई :-पोलीस हवालदाराने अलीकडे घेऊन दिली होती लेकाला KTM, मुलाने त्यांच्याच सर्व्हिस रिवॉल्व्हरने झाडली स्वत:वर गोळी!
मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई पोलीस दलातील एका पोलीस हवालदाराच्या मुलाने आत्महत्या केली आहे. वडिलांच्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून डोक्यात गोळी झाडून स्वत: चं आयुष्य संपवलं आहे.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील एन एम जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. हर्ष म्हस्के (वय २० ) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. तर संतोष म्हस्के असं पोलीस हवालदाराचं नाव आहे. संतोष म्हस्के हे एसपीयू युनिटमध्ये असून एका मोठ्या नेत्याच्या बंदोबस्तासाठी तैनात आहेत. त्यांचा मुलगा हर्ष याने राहत्या घरी आज दुपारी वडिलांनी सुरक्षितपणे ठेवलेली सर्व्हिस रिवॉल्व्हर घेतली आणि स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून हर्षचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.
अलीकडे, संतोष म्हस्के यांनी हर्षला केटीएमची महागडी बाईक घेऊन दिली होती. पण त्यांच्या मुलाने हे कृत्य का केलं हे अद्याप समोर येऊ शकलं नाही. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.