HIV मुळे मुलीच्या मृत्यूची अफवा, गावकऱ्यांनी कुटुंबाला वाळीत टाकलं; बीडमधील धक्कादायक घटना, सुप्रिया सुळेंचा संताप
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासह अनेक गुन्हेगारी घटनांमुळे बीड जिल्हा सध्या चर्चेत आहे. दरम्यान, आता बीडमधील आष्टी तालुक्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
येथील एका गावातील मुलीच्या मृत्यूनंतर गावात एक अफवा पसरली आणि या अफवेमुळे गावकऱ्यांनी मृत मुलीच्या कुटुंबाला वाळीत टाकल्याचं समोर आलं आहे. एचआयव्हीमुळे त्या मुलीचा मृत्यू झाल्याची अफवा गावात पसरली होती. मात्र, “आमच्या कुटुंबाबद्दल खोटी माहिती पसरवून बदनामी केली जात आहे”, असा आरोप या पीडित कुटुंबाने केला आहे. तसेच या अफवेमुळे पीडित कुटुंबातील एका महिलेने दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं कुटुंबातील एका सदस्याने म्हटलं आहे. एचआयव्हीबाबत अफवा पसरवण्यात आरोग्य विभाग व पोलिसांचा हात असल्याचा आरोपही या कुटुंबाने केला आहे. दुसऱ्या बाजूला, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. तर, खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेचं वृत्त समजताच संताप व्यक्त केला आहे.
दरम्यान, पीडित कुटुंबातील एक सदस्य व एका अनोळखी व्यक्तीमधील फोनवरील कथित संभाषण टीव्ही ९ मराठीने प्रसारित केलं आहे. यामध्ये अनोळखी व्यक्ती पीडित कुटुंबातील सदस्याला म्हणाली की “तुमच्या मुलीचा एचआयव्ही व कॅन्सरमुळे मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. डॉक्टरांनी सांगितलं की नातेवाईकांना मृतदेहाच्या जवळ जाऊ देऊ नका. मी हे केवळ तुम्हालाच सांगतोय. अत्यंविधीला पाहुण्यांना येऊ देऊ नका असंही डॉक्टरांनी सांगितलं होतं.
खासदार सुप्रिया सुळेंचा संताप
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेवरून संताप व्यक्त केला आहे. खासदार सुळे म्हणाल्या, “अशा अफवा पसरवल्या जाऊ नये. एखाद्या व्यक्तीला एखादा आजार असेल तर त्या व्यक्तीला उपचार दिले पाहिजेत. अशा अफवा पसरवून कोणालाही वाळीत टाकू नये. कुठल्याही कारणामुळे एखाद्या कुटुंबावर अन्याय करू नये. त्याचबरोबर एड्स हा आजार वेगवेगळ्या कारणांनी पसरतो. त्यांना वाळीत टाकण्यापेक्षा अशा लोकांना आधार द्यायला हवा. समाजाने त्यांच्याबरोबर उभं राहायला हवं. जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना एड्स आहे. त्यामुळे आपण खूप गांभीर्याने व संवेदनशीलपणे असे विषय हाताळले पाहिजेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.