Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News !अजित पवार करणार भाजपचा गेम? 'हा' बडा नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश

Breaking News !अजित पवार करणार भाजपचा गेम? 'हा' बडा नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश
 

पिंपरी:- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस असा सामना बघायला मिळाला होता. पुन्हा एकदा अशीच राजकीय परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. याला कारण आहे माजी आमदार विलास लांडे यांच्या राजकीय कोलांटी उडीचे. 

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेकांनी अजित पवार यांची साथ सोडून महाविकास आघाडीत सहभागी होण्याची भूमिका घेतली. यामध्ये भोसरीचे माजी आमदार विलास लांडे आणि तत्कालीन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आघाडीवर होते. शहराध्यक्ष गव्हाणे २० नगरसेवकांसह अजित पवार यांच्यापासून दूर गेले.

मात्र, आता पुन्हा एकदा माजी आमदार विलास लांडे आणि त्यांचे शिष्य अजित गव्हाणे यांनी आगामी महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी सत्तेसोबत जुळवून घेण्याचे धोरण ठेवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्याची तयारी सुरू केली आहे. याबद्दल स्वतः विलास लांडे यांनी माध्यमांशी बोलताना सूचक वक्तव्य केले आहे. यामुळे पुन्हा एकदा स्थानिक पातळीवर महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस असा सामना होऊ शकतो.
लोकसभा निवडणुकीत विलास लांडे आणि अजित गव्हाणे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार केला, असा दावा विधानसभा निवडणुकीवेळी करण्यात आला. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी पर्यायाने राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला चांगले यश मिळाले होते. त्यामुळे लांडे-गव्हाणे यांनी समर्थकांसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम ठोकला आणि शरद पवारांशी हातमिळवणी केली होती.

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या 'तुतारी' चिन्हावर भोसरीची निवडणूक लांडे आणि गव्हाणे यांनी प्रतिष्ठेची आणि अटीतटीची केली. मात्र, भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आणि वर्चस्व कायम ठेवले. त्यामुळे लांडे-गव्हाणे यांच्यासह त्यांच्यासोबत महाविकास आघाडीत दाखल झालेल्या २० ते २५ समर्थक माजी नगरसेवकांची भूमिका काय राहणार? हा आता प्रश्‍न आहे.

सत्तेसाठीच पुन्हा जवळीक..! 
 
विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेसने मोठे यश मिळवले. भाजप किंवा शिवसेनेत संधी नाही. त्यामुळे विलास लांडे आणि अजित गव्हाणे यांनी 'पवार कुटुंबीयांशी निष्ठा' हे सूत्र पुढे करत अजित पवार यांच्याशी जुळवून घेण्यासाठीची मांडणी केलेली आहे. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये भाजपसमोर आपला निभाव लागणार नाही, याचा अंदाज आल्यामुळेच विलास लांडे यांनी अजित पवार यांच्याबाबत साखरपेरणी सुरू केली आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

भाजप-राष्ट्रवादीत वादाची ठिणगी..!
महायुतीमधील घटकपक्ष आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार, असे संकेत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षात स्थान मिळवण्यासाठी माजी आमदार विलास लांडे आणि अजित गव्हाणे इच्छुक आहेत. त्यासाठी अजित पवार यांच्यासोबत संवाद झाला असून, 'हिरवा कंदील मिळाला आहे.

गव्हाणे यांनी त्यांच्या समर्थकांसह अजित पवार यांच्याबरोबर जावे, असा सूर लांडे यांनी आळवला आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांच्या विरोधात अजित गव्हाणे यांनी उमेदवारी घेतली आणि महायुतीविरोधात विशेषतः महेश लांडगे यांच्या विरोधात आक्रमक प्रचार करण्याची भूमिका लांडे यांनी घेतली. त्यामुळे महायुतीविरोधात काम करणाऱ्यांना अजित पवार यांनी बळ दिल्यास शहरात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी कॉंग्रेस अशी स्थानिक वादाची ठिणगी पडणार आहे, असेही राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.