Breaking News ! कोर्टात SIT चे 7 खळबळजनक दावे; खंडणीला अडथळा ठरल्याने संतोष देशमुखांचा खून, वाल्मिक कराड आणखी गोत्यात?
बीड : जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या नेमकी कशामुळे झाली, या हत्येमागे कोणाचा हात आहे, गेल्या महिनाभरापासून राज्यातील जनेतला हा प्रश्न पडला आहे. मात्र, या घटनेचा तपास ज्या सीआयडीकडे देण्यात आला आहे, त्या एसआयटीने आज वाल्मिक कराडला कोर्टात हजर केले असता महत्त्वाची माहिती दिली. खंडणी प्रकरण आणि हत्याप्रकरणाची इंटरलिंक असल्याचे सांगत खंडणीप्रकरणामुळेच ही हत्या झाल्याचा दावा न्यायालयात करण्यात आला. अवादा कंपनीकडून देण्यात येणाऱ्या खंडणीला अडथळा ठरत असल्यानेच संतोष देशमुखांची हत्या करण्यात आल्याचे एसआयटीने (SIT) न्यायालयात माहिती देताना सांगितले. त्यामुळे, याप्रकरणाच्या आणखी तपासासाठी वाल्मिक कराडची चौकशी करायची असल्याचं सांगत आरोपीची पोलीस कोठडी मागण्यात आली होती. त्यानुसार, वाल्मिक कराडला 7 दिवसांची न्यायालयीने कोठडी सुनावण्यात आली आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणी एसआयटीने बीड न्यायालयात दिलेल्या माहितीत अनेक मोठे खुलासे केले आहेत. वारंवार अवादा कंपनीकडे आरोपींकडून खंडणी मागण्यात येत होते, पण कंपनीने दिली नाही. त्यावेळी, संतोष देशमुख हेच खंडणीसाठी अडथळा ठरत असल्याने त्यांची हत्या करण्यात आल्याचं एसआयटीने न्यायालयात म्हटलं आहे. एसआयटीने आज न्यायालयात 7 दावे केले आहेत. सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि चाटे यांनी अवादाच्या अधिकाऱ्यांना धमकावूनही खंडणी दिली नव्हती. अवादा कंपनीची बाजू घेत देशमुखांनी सुदर्शन घुलेला आव्हान दिलं होतं. खंडणीला अडथळा ठरले म्हणून वाल्मिक कराड आणि इतर आरोपीनी संतोष देशमुखांची हत्या केल्याचा दावा एसआयटीने केला आहे.
एसआयटीचे कोर्टात 7 दावे
1. 9 डिसेंबर 2024 रोजी सुदर्शन घुले व त्याच्या साथीदारांनी मयत संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांचा खून केला. याकाळात सुदर्शन घुले, विष्णू चाटे व वाल्मिक कराड यांचे घटनेच्या अगोदर, नंतर का घटनेदरम्यान एकमेकांना कॉल असल्याचे सीडीआरवरुन दिसत आहेत.2. 29 नोव्हेंबर 2024 रोजी पूर्वी ऑक्टोबर महिन्यात सुदर्शन घुले याने सदर कंपनीचे काम बंद पाडले होते.3. अवादा कंपनीचे शिवाजी थोपटे यांना अनेकवेळा परळी येथील कार्यालयात बोलवून आरोपी वाल्मिक कराडने दोन कोटी रुपये खंडणीची मागणी केली होती, आणि न दिल्यास काम बंद करण्याची धमकी दिली होती.4. 29 नोव्हेंबर रोजी वाल्मिक कराडने विष्णू चाटे याच्या फोनवरुन सुनिल शिंदे यांना फोन करुन काम बंद करण्याची व सुदर्शन म्हणतो त्याप्रमाणे करण्याची धमकी दिली होती.5. त्याचदिवशी सुदर्शनने अवादा कंपनी येथे जाऊन वाल्मिक कराड यांची डिमांड पूर्ण करण्याची नाहीतर काम बंद करण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपींच्या मागण्या पूर्ण न झाल्याने दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी सुदर्शन घुले व त्यांच्या साथीदारांनी पुन्हा अवादा कपंनी येथे जाऊन तेथील गार्ड व शिवाजी थोपटे यांना मारहाण, शिवीगाळ व धमकी दिली होती.6. त्यादिवशी मयत संतोष देशमुख व गावकऱ्यांनी विरोध केल्यावरुन 9 डिसेंबर 2024 रोजी खंडणीला अडथळा ठरणाऱ्या मयत संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांचा खून केला आहे.7. दरम्यान, वरील सर्व घटना होत असतानाच्या काळात आरोपी वाल्मिक कराड इतर आरोपींच्या संपर्कात असल्याचे सीडीआरवरुन दिसून येत आहे.
वाल्मिक कराडच्या कोठडीसाठी SIT ने दिलेली कारणे
या गुन्हयातील आरोपींनी कट करुन अत्यंत गंभीर स्वरुपाचा गुन्हा केलेला आहे. सदर गुन्हयातील एक आरोपी अटक होणे बाकी असून तो आरोपी फरार होण्यामध्ये वाल्मीक कराड यांनी काही मदत केली आहे का ? त्याबाबत तपास करणे आहे. नवीन अटक झालेले आरोपी व सदर आरोपी यांचेकडे एकत्र बसवून गु्न्ह्याचे संबंधाने तपास करणे बाकी आहे. आरोपी वाल्मिक कराडने मयत संतोष देशमुख यांना दिलेल्या धमकीबाबत तपास करणे आहे. आरोपी घटनेच्या दरम्यान मोबाईलवरुन एकमेकांच्या संपकांत होते, त्यांचेत काय बोलणे झाले याचा तपास करणे आहे. सदरच्या गुन्हयामध्ये आणखी कोणत्या आरोपीचा सहभाग आहे का याबाबत तपास करणे आहे. सदर आरोपी संघटीत गुन्हे करण्यामध्ये सवयीचे असून या संदर्भात सखोल तपास करणे आहे, म्हणून 10 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी एसआयटीने कोर्टात केली होती. मात्र, 7 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.