सांगली :- बसचे चाक डोक्यावरून गेल्याने दोन युवकांचा दुर्दैवी अंत; अपघाती निधनाने परिसरात पसरली शोककळा
दुचाकीवरील सुखदेव व प्रयास हे दोघे रस्त्यावर पडले. याचवेळी बाजूने जोतिबा-तासगाव ही बस (एमएच १४, बीटी ६१०) जात होती.
भिलवडी : येथे काल (ता. १३) दुपारी झालेल्या तिहेरी अपघातात बसचे चाक डोक्यावरून गेल्याने दोन युवकांचा मृत्यू झाला.
सुखदेव तानाजी गेजगे (वय २०) व प्रयास केशव सकटे (वय १५, दोघेही रा. साठेनगर, माळवाडी, ता. पलूस) अशी मृतांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, येथील माळवाडी रस्त्यावरील सेकंडरी स्कूलसमोर सांगलीकडे खासगी प्रवासी वाहतूक करणारी मोटार (एमएच १०, के ५९२) अचानक रस्त्यावर थांबली. यावेळी पाठीमागून येणाऱ्या दुचाकीने (एमएच १०, इएल २७९६) मोटारीस धडक दिली.
त्यामुळे दुचाकीवरील सुखदेव व प्रयास हे दोघे रस्त्यावर पडले. याचवेळी बाजूने जोतिबा-तासगाव ही बस (एमएच १४, बीटी ६१०) जात होती. अचानक दोघे दुचाकीस्वार बसखाली आल्याने बसची पाठीमागील चाके दोघांच्या अंगावरून गेली. त्यामध्ये दोघेही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. ग्रामस्थांनी तत्काळ दोघांना भिलवडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात व त्यानंतर सांगलीच्या वसंतदादा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले परंतु, उपचारापूर्वीच प्रयासचा, तर उपचारादरम्यान सुखदेवचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. प्राची केशव सकटे यांनी भिलवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी बसचालक अनिल मारुती माळी (वय ५४, रा. पानमळ्याचीवाडी, ता. तासगाव) व प्रवासी मोटारचालक अमित कोकडे (रा. सांगली) यांना ताब्यात घेतले. प्रयास एकुलता होता, तर सुखदेव शेजारीच रहात होता. त्यांच्या अपघाती निधनाने परिसरात शोककळा पसरली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.