मिरज : मिरजेतसांगली रस्त्यावर रेल्वे हद्दीत रेल्वेचा बहुपयोगी मॉल उभारण्यात येणार असून, यासाठी निविदा काढण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेचे पुणे विभागीय नूतन व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा यांनी मिरजेत जागेची पाहणी केली. त्यांनी पुणे ते कोल्हापूर रेल्वे मार्गावर सुरू असलेल्या विविध कामांचीही पाहणी केली. मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय व्यवस्थापकपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर राजेशकुमार वर्मा यांनी सातारा, मिरज व कोल्हापूर पाहणी दौरा केला. मिरज-सांगली रस्त्यावर कृपामयीसमोर असणाऱ्या रेल्वेच्या जागेत रेल्वेतर्फे बहुपयोगी मॉल उभारण्यात येणार आहे.
या परिसरातील अतिक्रमणे व झोपडपट्टी हटविण्यात आली आहेत. रेल्वेच्या या बहुपयोगी मॉलमध्ये दुकाने, हॉटेल, लॉज, सिनेमागृह असणार आहे. या कामासाठी निविदा काढण्यात येणार आहे. यासाठी मिरजेतील जागेची रेल्वेच्या
विभागीय व्यवस्थापक व अधिकाऱ्यांनी पाहणी केली. या कामाची निविदा काढण्याची
प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुणे ते कोल्हापूर रेल्वे मार्गावर अमृत
भारत योजनेंतर्गत मिरज रेल्वेस्थानकाचा विकास करण्यात येणार आहे.
मिरज-सांगली रस्त्यावरील जुन्या पुलाची पाहणी
विभागीय व्यवस्थापकांनी कोल्हापूर, हातकणंगले, मिरज, सांगली, कराड, सातारा या स्थानकांची पाहणी केली. मिरज रेल्वेस्थानकासह अपघात मदत व्हॅन, मालधक्का, गुड्स यार्ड, आरआरआय, लॉबी या विभागांची पाहणी केली. काही विभागात त्रुटी आढळल्याने त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना खडसावले. पुणे ते मिरज या २८० किमी दुहेरीकरण व विद्युतीकरण पूर्ण होत आले आहे. या कामासह मिरज-सांगली रस्त्यावरील जुन्या पुलाची पाहणी व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा यांनी केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.