चिपळूण:- आरोपीची उलट तपासणी न करण्यासाठी लाच मागितल्याने खेडमधील सरकारी वकिलला चिपळूणमध्ये लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. श्री. राजेश देवराव जाधव, विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग १, खेड, ता. खेड, जि. रत्नागिरी यांना तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी यांनी ताब्यात घेतले.
काल संध्याकाळी चिपळूण येथील ओयासीस हॉटेल येथे दिनांक गुरुवारी १९.१७ वाजता रंगेहाथ पकडण्यात आलेले असून चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.श्री. राजेश देवराव जाधव, विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वर्ग १, खेड, ता.खेड, जि. रत्नागिरी यांनी ५,००,००० रुपयांची मागणी केलेली लाच रक्कम होती आणि स्वीकारलेली लाच रक्कम १,५०,००० रुपये होती.याबाबत सविस्तर असे की,यातील तक्रारदार यांनी घरडा कंपनीच्या केसमध्ये प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, वर्ग १, खेड यांचे न्यायालयात वकीलपत्र घेतलेले आहे. सरकार पक्षाच्यावतीने सदरची केस श्री. राजेश देवराव जाधव, विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता हे पाहात होते.
दिनांक २६ डिसेंबर २०२४ व दिनांक ०३ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाईमध्ये लोकसेवक राजेश जाधव यांनी तक्रारदार यांच्याकडे साक्षीदारांना शिकवणार नाही, तुमची केस कशी सुटेल, असे प्रयत्न करेन, जास्त उलट तपास न घेता महत्वाचे मुद्दे वगळून आरोपी निर्दोष कसे सुटतील व केस लवकर संपवायला मदत करण्यासाठी ५,००,००० रुपयांची मागणी करुन त्यापैकी पहिला हप्ता म्हणून १,५०,००० रू. स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झालेले होते. त्यानंतर दिनांक ९ जानेवारी २०२५ रोजी सापळ्याचे आयोजन करुन लोकसेवक राजेश जाधव यांना तक्रारदार यांच्याकडून १,५०,००० रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.