Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

एमबीए महिलेने नाशिकच्या रुग्णालयातून चोरलं बाळ, कारण समजताच पोलीसही हळहळले

एमबीए महिलेने नाशिकच्या रुग्णालयातून चोरलं बाळ, कारण समजताच पोलीसही हळहळले
 

प्रतिनिधीनाशिक कायम विविध कारणांनी चर्चेत येणारं नाशिकचं जिल्हा रुग्णालय पुन्हा एकदा चर्चेत आलंय. प्रसुती झालेल्या महिलेच्या पाच दिवसाच्या बाळाची चोरी करण्यात आली होती. या प्रकरणानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत बाळ चोरी करणाऱ्या महिलेला ताब्यात घेऊन बाळाला सुखरूप आईच्या स्वाधीन केले. मात्र पोलिसांनी केलेल्या या प्रकरणाच्या तपासात धक्कादायक कारण समोर आलंय.

नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात सटाणा तालुक्यातील सुमन खान या महिलेचे सिजर करून प्रसुती झाली. या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला आणि त्यानंतर तिला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातच दाखल करण्यात आले होते. या दरम्यानच एमबीए असलेल्या सपना मराठे या महिलेने सुमन खान यांच्याशी ओळख करून खान यांचा विश्वास संपादन केला त्यांना रुग्णालयातच नातेवाईक कामाला असल्याचं सांगितलं.

 
डिस्चार्जच्या दिवशी महिलेचा पती रिपोर्ट आणण्यासाठी गेला असताना सपना मराठे प्रसुती झालेल्या महिलेकडे आली. तुम्ही मागून या, तुमचे टाके दुखतील मी, तुमच्या बाळाला घेऊन जाते, असं सपनाने सांगितलं. त्यानंतर सपना रुग्णालयातून बाळाला घेऊन पसार झाली. रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर सुमनला बाळ आणि महिला गायब झाल्याचं समजलं, यानंतर महिलेने आणि तिच्या पतीने रुग्णालय प्रशासनाकडे बाळ चोरीला गेल्याची तक्रार केली.
12 तासात सापडलं बाळ

बाळ हरवल्याची फिर्याद अब्दुल खान यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिली. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ विविध पथके रवाना केली. नाशिक गुन्हे शोध पथकाने अवघ्या 12 तासात बाळ शोधून आईकडे सोपवले. आईला डिस्चार्ज दिल्यानंतर बाळ चोरीला गेल्याचं सांगत जिल्हा रुग्णालयाने जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला.

बाळ चोरी गेल्यानंतर नाशिक शहर पोलिसांचे विविध पथके या महिलेच्या मागावर होते. जिल्हाभरात पोलिसांचे पथक महिलेच्या तपासासाठी असतानाच पंचवटी येथील एका खाजगी रुग्णालयात एक महिला लहान बाळाला घेऊन आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी या महिलेची माहिती घेतली आणि बाळ चोरलेली महिला हीच असल्याचं समोर आलं.

 

कारण ऐकून पोलीसही चक्रावले

सपना मराठे ही उच्चशिक्षित महिला धुळे जिल्ह्यातील आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीतून पोलिसांनी सपना मराठेला ताब्यात घेतलं. महिलेला पोलिसांनी ताब्यात घेत सखोल चौकशी केली असता बाळ चोरी का केली? हे सांगताना महिलेने सांगितलेली हकीगत बघून पोलीस देखील काही काळ चक्रावले. बाळ होत नसल्याने ही महिला नाशिक जिल्हा रुग्णात आली आणि नवजात बाळ चोरी करण्याचे ठरवले आणि बाळ चोरले.

सपना मराठे ही महिला उच्चशिक्षित असल्याचे पोलीस तपासातून समोर आलं आहे. या महिलेचे दोनदा अबोर्शन झाले असून या महिलेला बाळ होत नसल्याने बाळ चोरी केल्याचं पोलिसांना सांगितले. महिलेच्या नातेवाईकांची चौकशी केल्यानंतर मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनाही धक्का बसला. सपना मराठे आणि तिचा पती हे दोघे धुळे येथे वास्तव्यास आहेत.
वडिलांनीच दिली पोलिसांना माहिती

एमबीएचे शिक्षण झालेल्या महिलेने लेखापाल पदाची परीक्षा देखील उत्तीर्ण केल्याचं पोलिसांनी सांगितले. गेल्या 9 महिन्यांपासून महिलेने इतर नातेवाईकांना न भेटता प्रेग्नेंट असल्याचे सांगितले. आणि बाळ चोरी करून ही महिला तिच्या घरी गेली. महिलेच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनंतर सपना मराठे ही खोटं बोलत असल्याचं समोर आलं आणि तिचं संपूर्ण बिंग फुटले. नाशिक जिल्हा रुग्णालयात हा प्रकार घडल्यानंतर पुन्हा एकदा जिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. मागील महिन्यात जिल्हा रुग्णालयातून बाळ अदलाबदल झाल्याची घटना घडली होती. आणि आता जिल्हा रुग्णालयातून थेट बाळच चोरी गेल्याने जिल्हा रुग्णालय प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.