मुंबई: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह इतर कल्याणकारी योजनांचा भार सरकारच्या तिजोरीवर वाढला आहे. लोककल्याणकारी योजना आणि पायाभूत सुविधा, विकास कामांसाठी निधी उभारण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. तिजोरीवर असलेला भार कमी करण्यासाठी
सरकारकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. सरकारची तिजोरी भरण्यासाठी
तळीरामांच्या, मद्यप्रेमींच्या खिशावर भार येण्याची शक्यता आहे. महसूल
वाढीसाठी मद्यावरील वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणावर विविध विकास कामे, प्रकल्प सुरू आहेत. तर, दुसरीकडे निवडणुकीआधी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा मोठा भार सरकारच्या तिजोरीवर पडला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडून इतर योजनांचा, खात्यांचा निधी दिला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. सरकारच्या तिजोरीवर आर्थिक भार वाढत चालला आहे. आता हा भार कमी करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू झाले असून विविध उपाययोजना आखल्या जात आहेत.
मद्याचे दर वाढणार...
महसूल वाढीसाठी दारुवरील कर वाढण्याची शक्यता आहे. दारू विक्रीस चाप लावत सरकार महसूल वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. पाच सदस्यीय समितीला अभ्यास करण्याच्या सूचना करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत महसूल वाढीसाठी सरकार प्रयत्न करणार आहे. मद्य निर्मिती धोरण, अनुज्ञप्ती प्रकार, उत्पादन शुल्क व कर संकलन वाढीचा अभ्यास ही समिती करणार आहे. या समितीला महसूल वाढीच्या चांगल्या पद्धती व धोरणांचा अभ्यास करण्यास समितीला 2 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
महसूल वाढीसाठी या उपाययोजनांची शक्यता...
महसूल वाढीसाठी विदेशी मद्याच्या आयात करात वाढ होऊ शकते. अनुज्ञप्तीसाठी (परवान्यासाठी) आकारण्यात येणाऱ्या शुल्कात वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. देशी व विदेशी मद्याचा उत्पादन शुल्कात वाढ करत महसूल वाढीची शिफारस समिती करू शकते. दरवर्षी नुतनीकरण होणाऱ्या परवाना शुल्कात ही वाढ होऊ शकते. एकूणच मद्यावरील कर आणि शुल्कात वाढ केल्यामुळे तळीरामांना आर्थिक चटका सहन करावा लागू शकतो.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.