बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नाव आल्यानंतर भाजप नेते मोहित कंबोज यांची पहिली प्रतिक्रिया
मागच्यावर्षी 12 ऑक्टोंबरला दसऱ्याच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची वांद्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. अत्यंत निघृण पद्धतीने बाबा सिद्दीकी यांचा खून करण्यात आला होता. हे एक हाय-प्रोफाईल हत्येच प्रकरण आहे. ही एक मोठी राजकीय हत्या असल्याने मुंबईत एकच खळबळ उडाली होती. लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारली. या प्रकरणाचा तपास करताना मुंबई पोलिसांनी 4500 पानी आरोपपत्र दाखल केलय. एकूण 26 आरोपी या प्रकरणात आहेत. लॉरेन्स बिश्नोई गँगने ही हत्या केली, पण हत्या का झाली? त्यामागे काय उद्देश आहे? हे अजून पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर त्यांचा मुलगा आणि तत्कालिन आमदार झिशान सिद्दीकीचा जबाब नोंदवण्यात आला. वडिलांची हत्या झाली, त्यावेळी झिशान सिद्दीकी आमदार होता. नोव्हेंबर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पूर्वमधून झिशान सिद्दीकीचा पराभव झाला. तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत होता. झिशान सिद्दीकीने पोलिसांनी जी जबानी दिली, ती आता समोर आली आहे. बाबा सिद्दीकीच्या हत्येमागे रिअल इस्टेटचा अँगल असल्याचा झिशानचा दावा आहे. यासाठी त्याने जबानीत काही बिल्डर्सची नाव घेतली, त्या अनुषंगाने तपास व्हावा असं त्याचं म्हणणं आहे. आता बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात दोन नेत्यांची नाव सुद्धा समोर आली आहेत.मोहित कंबोज यांना बाबा सिद्दीकींना का भेटायचं होतं?
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजप नेते मोहित कंबोज यांचं नाव समोर आलं आहे. अनिल परब हे एसआरए प्रकल्पात स्वतंत्र बिल्डर आणण्याचा प्रयत्न करत होते. बाबा सिद्दीकी हे डायरी लिहायचे. हत्या झाली त्या दिवशी संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान व्हॉट्स अॅपवरुन त्यांचं मोहित कंबोज यांच्याशी बोलणं झालं होतं. एका बिल्डरच्या पाठपुराव्यासाठी मोहित कंबोज यांना बाबा सिद्दीकी यांना भेटायचं होतं.
मोहित कंबोज काय म्हणाले?
या प्रकरणात नाव आल्यानंतर आता मोहित कंबोज यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. "दिवंगत बाबा सिद्दीकी माझे चांगले मित्र होते. मागच्या 15 वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखत होतो. ते एनडीएचा भाग होते. निवडणुकीसह विविध विषयांवर आम्ही नियमित बोलायचो. ही घटना घडली, त्यावेळी मला धक्का बसला. त्या कठीण प्रसंगात मी त्यांच्या कुटुंबासोबत रुग्णालयात होतो. दुर्दैवाने हे आम्हा सर्व मित्रांच नुकसान आहे. सत्य समोर आलं पाहिजे आणि न्यायाचा विजय झाला पाहिजे" असं मोहित कंबोज यांनी म्हटलय.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.