Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'प्रियंका गांधींच्या गालासारखे मऊ...', भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान, काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

'प्रियंका गांधींच्या गालासारखे मऊ...', भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान, काँग्रेसचा आक्रमक पवित्रा
 

दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. सर्वच राजकीय पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. अशात आता भाजपचे उमेदवार रमेश बिधुरी यांनी काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मी जर निवडून आलो, तर प्रियंका गांधी यांच्या गालाप्रमाणे गुळगुळीत रस्ते बनवून दाखवेन, असं वक्तव्य बिधुरी यांनी केलं आहे. बिधुरी यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली असून त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

 
रमेश बिधुरी हे दिल्लीतील कालकाजी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार आहेत. रविवारी प्रचारादरम्यान त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ही निवडणूक आपण जिंकलो तर मतदारसंघातील रस्ते प्रियंका गांधी यांच्या गालाप्रमाणे गुळगुळीत करून दाखवेन, अशा आशयाचं विधान बिधुरी यांनी केलं आहे. बिधुरी यांच्या वक्तव्यावर काँग्रेसच्या प्रवक्ता सुप्रिया श्रीनेत संतापल्या आहेत.  सुप्रिया श्रीनेत यांनी भारतीय जनता पार्टी महिलांविरोधी पक्ष असल्याचं म्हटलं आहे. तसेच बिधुरी यांनी केलेलं वक्तव्य लज्जास्पद असून यातून त्यांचे महिलांबाबतचे गलिच्छ विचार दिसून येतात. हाच खरा भाजपचा चेहरा आहे, अशा शब्दांत सुप्रिया श्रीनेत यांनी रमेश बिधुरी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

बिधुरी यांच्या वक्तव्यानंतर आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांनीही भाजपवर टीका केली. त्यांनी रमेश बिधुरी यांचा व्हिडीओ एक्स अकाऊंटवर पोस्ट करत हा भाजपचा उमेदवार आहे, त्यांची भाषा ऐका. असं भाजप महिलांचा सन्मान करते. अशा नेत्यांच्या हाती दिल्ली गेली, तर दिल्लीतील महिलांचा सुरक्षित असतील का? असा प्रश्न संजय सिंह यांनी विचारला आहे.

दरम्यान, या सगळ्या घडामोडींवर स्वत: रमेश बिधुरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी इंडिया टुडेशी बोलताना लालू प्रसाद यादव यांच्या वक्तव्याची आठवण करून दिली. लालू प्रसाद यादव एकदा म्हणाले होते की ते बिहारचे रस्ते हेमा मालिनी यांच्या गालासारखे गुळगुळीत करतील. आता माझ्या विधानामुळे काँग्रेस दुखावली असेल, तर हेमाजींचं काय? त्या एक प्रसिद्ध नायिका राहिल्या आहेत. त्यांनी भारतीय चित्रपट सृष्टीचा गौरव वाढवला आहे. जर लालूंचं विधान चुकीचं असेल, तर हे विधानही चुकीचं असेल, असं बिधुरी म्हणाले. बिधुरी यांच्या वक्तव्यानंतर दिल्लीतील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.